Breaking News

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

 महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

 कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारकडून १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत हा लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान राज्य सरकारने कडक निर्बंध लादून हा लॉकडाऊन सुरू आहे. राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचे संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसंबंधी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विधान केले.महाराष्ट्रातील कोरोना स्थितीबाबत विचारण्यात आले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला”.यापुढे बोलताना ते असे म्हणाले की, “सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाण व्हावे लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असेही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाऊन वाढणार की नाही असे विचारण्यात आले तेव्हा ते असे म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.

Post a Comment

0 Comments