आटपाडी ( जि . सांगली ) : कार्तिक यात्रा रद्द करून त्याऐवजी भरलेल्या शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात सांगोल्याचे शेतकरी बाबुराव मिटकरी यांच्या मोदी बकऱ्याला 70 लाखांची मागणी झाली .
त्यांनी या बकऱ्याची दीड कोटी किंमत सांगितली आहे . याशिवाय जातिवंत बकरी आणि मेंढ्यांची लाखो रुपयांत खरेदी - विक्री झाली .आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यात पौर्णिमेला भरते . यावर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द केली आहे . मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेळ्या - मेंढ्यांचा बाजार दोन दिवस भरवण्याचा निर्णय घेतला होता . यात रविवारी ( ता . 29 ) पहिल्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च शेळ्या - मेंढ्यांचा बाजार भरला . यामध्ये सांगली , सातारा , कोल्हापूर , विजापूर या भागातील मेंढपाळ जातिवंत बकरे आणि मेंढ्या विक्रीसाठी घेऊन आले होते . त्याच्या खरेदीसाठी हौशी मेंढपाळही मोठ्या संख्येने दाखल झाले होते . या बाजारामध्ये सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांनी आणलेला मोदी बकरा सर्वाधिक आकर्षक ठरला . त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती . या बकऱ्याला सुरवातीला 70 लाखांची मागणी नोंदवली आहे ; मात्र मिटकरी यांनी याची किंमत दीड कोटी सांगितली आहे . या बकऱ्याच्या मागणीचा किमतीत वाढ होत चालली आहे . याशिवाय या " मोदी'चे लहान पिल्लू असलेल्या या सोमनाथ जाधव यांच्या दोन महिन्यांच्या मेंढीला 14 लाखांची मागणी केली आहे . बाजारामध्ये एक लाखापासून दोन , चार , सहा , दहा - बारा लाखांपर्यंत बकऱ्यांना मागणी होत होती . बाजारात शेळ्या - मेंढ्यांच्या खरेदीसाठी पुणे , गोवा , कोल्हापूर , सांगली येथून मोठ्या संख्येने व्यापारी आले होते . यावेळी जातिवंत बकऱ्याची हलगीच्या साथीने बाजार आवारातून मिरवणूक काढली जात होती . शेतकऱ्यांनी मेंढ्याआणि बकरे सजवून विक्रीसाठी आणले होते . बाजाराला माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड , संचालक विष्णू अर्जुन , सरपंच वृषाली पाटील आदींनी भेट दिली . म्हणून दिले मोदींचे नाव ... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले काम करून जगभर नाव मिळवले आहे . ते आमचे आदर्श आहेत , त्यामुळे त्यांचे नाव या बकऱ्याला दिले आहे . आमच्या या जातिवंत बकऱ्याचाही मोठा नावलौकिक झाला आहे . तो आमचा जीव की प्राण आहे . जतच्या व्यापाऱ्याने 70 लाखापर्यंत मागणी केली आहे . मात्र आम्ही दीड कोटी रुपये किंमत सांगितली आहे . अनेकजण सांगतात , भरपूर किंमत झाली , विकून टाका ; पण आम्ही विकणार नाही कारण याच्यापासून होणाऱ्या पिल्ल्यांची दहा ते पंधरा लाखापर्यंत विक्री होते आणि केली आहे , असे बाबुराव मेटकरी यांनी सांगितले . असे जातिवंत बकरे कापण्यासाठी नाही , तर प्रजोत्पदानासाठी आणि नव्या संकरित जाती विकसीत करण्यासाठी उपयोगात आणले जातात , असे जाणकारांनी सांगितले


0 Comments