Breaking News

डॉ. अनिकेत भैया देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "मशरूमच्या औषधी व पौष्टिक गुणधर्मांवर राष्ट्रीय परिसंवाद " संपन्न

 डॉ. अनिकेत भैया देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "मशरूमच्या औषधी व पौष्टिक गुणधर्मांवर राष्ट्रीय परिसंवाद " संपन्न


पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी नवउद्योजक बनावे – प्राचार्य डॉ. शंकर धसाडे

सांगोला/प्रतिनिधी : संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, 

सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Medicinal and Nutritional Benefits of Mushroom in Daily Diet’ या विषयावर आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी विविध तांत्रिक सत्रे, मार्गदर्शन व चर्चासत्रांच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाला.

परिसंवादाच्या तांत्रिक सत्रामध्ये Last Grains Lab, पुणेचे प्रमुख श्री. डॅनिश मुन्ड्रोना यांनी ‘Mushroom Morphology’ या विषयावर शेतकरी, विद्यार्थी व उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 मशरूमची रचना, वाढीचे विविध टप्पे आणि उत्पादनासाठी आवश्यक बाबी यांची माहिती देताना त्यांनी Life Cycle of Mushroom, Tissue Culture, Agar Plate, Isolation Opportunity, Fungus, Culture Spawn आदी विषयांवर सखोल माहिती दिली. 

मशरूम उत्पादनामध्ये गुणवत्तापूर्ण कल्चर व स्पॉनचे महत्त्व, प्रयोगशाळेतील प्राथमिक प्रक्रिया तसेच मशरूमच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण याबाबत त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

त्यानंतर झालेल्या दुसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये परिसंवादाचे समन्वयक प्रा. डॉ. मनोजकुमार माने यांनी ‘मशरूम शेतीतून रोजगारनिर्मिती व मशरूम उत्पादनाचे तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

मशरूम शेतीसाठी कमी जागा, तुलनेने कमी पाणी आणि मर्यादित साधनसामग्रीमध्ये उत्पादन घेता येत असल्याने ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी मशरूम शेती रोजगाराचे प्रभावी साधन ठरू शकते,

 असे त्यांनी सांगितले. मशरूम उत्पादनाची सुरुवातीपासूनची प्रक्रिया, आवश्यक साहित्य, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या संधी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

दुपारी चार वाजता दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिसंवादाचे समन्वयक प्रा. डॉ. मनोजकुमार माने यांनी केले. 

यावेळी डॉ. मच्छिंद्र सोनलकर, श्रीमती चंदनशिवे, श्री. कांबळे यांच्यासह सहभागी शेतकऱ्यांनी मशरूम शेतीच्या प्रशिक्षणातून मिळालेला अनुभव व भविष्यातील संधी याबाबत आपली मनोगते व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या मनोगतानंतर संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान, 

कमी पाणी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पर्यायी शेती पद्धतींचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. कै. आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांचा कमी पाण्यात शेती करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा विचार होता. 

त्या विचाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासनानेही मशरूम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धसाडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मशरूम शेतीकडे केवळ पारंपरिक शेती म्हणून न पाहता 

उद्योजकतेची संधी म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. “मशरूम शेती करणाऱ्या व्यक्तीला केवळ शेतकरी न म्हणता नवउद्योजक किंवा उद्योगपती म्हणून संबोधले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

 मशरूमपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांमध्ये अनेक पोषक घटक व जीवनसत्त्वे असल्याने त्यांचा दैनंदिन आहारातील समावेश आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो.

 त्यामुळे मशरूम उत्पादनाबरोबरच त्याच्या प्रक्रिया उद्योगाला आणि मूल्यवर्धित उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या राष्ट्रीय परिसंवादास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ज्येष्ठ प्रा. डॉ. श्रीकांत रिटे, संजीवनी फार्म, नवसारी, गुजरातचे प्रमुख डॉ. मितेशकुमार पटेल,

 G.B.S. Mushroom & Agro Businessचे फाऊंडर मा. प्रफुल्ल शेंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, शेतकरी, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. सुप्रिया खंदारे व प्रा. शेख एन. एस. यांनी केले. तांत्रिक सहाय्य प्रा. रसाळ एन. एस. व श्री. कादरी एम. जे. यांनी केले. समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन सदर राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. शुद्धोधन कदम यांनी केले.

मशरूम उत्पादन, त्याचे औषधी व पौष्टिक महत्त्व, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेच्या संधी यांची शेतकरी व विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावरून माहिती मिळाल्याने हा राष्ट्रीय परिसंवाद ग्रामीण भागातील नवउद्योजकतेला चालना देणारा ठरला.

ही माहिती प्रसिद्धी समितीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments