सांगोला पोलीस ठाणे ‘रील पॉईंट’ बनतेय का? कारवाईपेक्षा सोशल मीडिया प्रसिद्धीची चर्चा; अधिकृत माहितीला प्राधान्य देण्याची मागणी
सांगोला (प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांवर कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही पोलिसांची प्रमुख जबाबदारी आहे.
त्याचबरोबर पोलिसांच्या विविध उपक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणेही जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
मात्र, सांगोला पोलीस ठाण्याशी संबंधित काही कारवायांचे व्हिडिओ आणि ‘रील’ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांकडून एखादी कारवाई, जनजागृती मोहीम किंवा सामाजिक उपक्रम राबविल्यानंतर त्याची अधिकृत, वस्तुनिष्ठ आणि सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना वेळेत मिळणे
अपेक्षित असते. मात्र, काही घटनांमध्ये अधिकृत माहिती माध्यमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच संबंधित फोटो, व्हिडिओ किंवा रील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झळकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘बातमीपेक्षा रीलला प्राधान्य?’
यामुळे सांगोला शहरात “पोलीस ठाण्यात प्रसिद्धी प्रमुख हवेत; बातमीपेक्षा रीलची भुरळ” अशी उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे.
पोलिसांच्या चांगल्या कामाची प्रसिद्धी होण्यास कोणाचाही आक्षेप नसला, तरी प्रसिद्धी आणि सोशल मीडिया कंटेंटच्या नादात अधिकृत माहिती प्रसारणाची प्रक्रिया मागे पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सांगोला पोलिसांच्या विविध कारवायांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, काही जण या माध्यमातून आपल्या पेजचे फॉलोअर्स आणि सबस्क्राइबर वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही चर्चा आहे.
त्यामुळे पोलिसांच्या कारवाईपेक्षा त्याच्या सोशल मीडिया प्रसिद्धीचीच अधिक चर्चा होऊ लागल्याचे चित्र काही नागरिक व्यक्त करीत आहेत.
पोलिस निरीक्षकांनी लक्ष देण्याची अपेक्षा
या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडिया प्रसिद्धी आणि अधिकृत माहिती प्रसारणाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व पत्रकारांकडून व्यक्त होत आहे.
सोशल मीडिया हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, रीलपेक्षा प्रत्यक्ष काम आणि प्रसिद्धीपेक्षा अधिकृत, विश्वासार्ह माहितीला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अन्यथा, “सांगोला पोलीस ठाणे कारवाईचे ठिकाण की रील पॉईंट?” असा प्रश्न भविष्यात उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


0 Comments