सोनंदच्या शेतात जुगार अड्ड्यावर पंढरपूर पोलिसांचा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगोला – विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील गट नं. १४८ परिसरात सुरू असल्याचे सांगितलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली.
दि. १६ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, मोटारसायकली
आणि चारचाकी वाहनांसह तब्बल ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रथम खबर हकीकतीत नमूद आहे.
पोलिसांना सोनंद येथील पडीत शेतजमिनीच्या उत्तरेकडील बाजूस झुडपांमध्ये तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी काही इसम गोलाकार टेबलाभोवती बसून जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, दुचाकी तसेच चारचाकी वाहन असा मुद्देमाल ताब्यात घेतला. कागदपत्रातील नोंदीनुसार जप्त मालाची एकूण किंमत ३६,१२,१२० रुपये आहे.
या प्रकरणात बबन जगनाथ काशीद, नितीन दादासाहेब ठवारे, संतोष जगनाथ मेटकरी, अविनाश बळीराम वसमाळे,
प्रविण बंडू वाघमारे, जगनाथ दादा कांबळे, समीर जाफर मुलाणी, संतोष श्रीकांत लोहार, श्रीकांत श्रीमंत तोडकर,
राहुल शामराव कोडगा, महेश राजाराम वायदंडे, अमोल राजाराम विधाते आणि सुकळेंदू प्रयत्न कांबळे यांच्यासह इतर इसमांचा उल्लेख पोलिसांच्या कागदपत्रात आहे.
काही संशयितांची पूर्ण नावे व पत्ते उपलब्ध नसल्याची नोंदही प्रथम खबर हकीकतीत करण्यात आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पंढरपूर शहर पोलिसांकडून सुरू आहे.
३६ लाखांच्या मुद्देमालाच्या या कारवाईमुळे सोनंद परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.


0 Comments