Breaking News

सांगोला पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांचा ठिय्या; संपादक किशोर म्हमाणे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध हल्लेखोराला तात्काळ अटक करण्याची मागणी; पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सांगोला पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांचा ठिय्या; संपादक किशोर म्हमाणे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध हल्लेखोराला तात्काळ अटक करण्याची मागणी; पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


सांगोला  : संपादक किशोर म्हमाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सांगोला पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांनी आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले असून, हल्लेखोराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पत्रकार समाजातील विविध प्रश्न आणि गैरप्रकार लोकांसमोर मांडण्याचे काम करतात. मात्र, पत्रकारांवरच हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची भावना आंदोलनकर्त्या पत्रकारांनी व्यक्त केली.

संपादक किशोर म्हमाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांनी सखोल चौकशी करून घटनेमागील संपूर्ण सत्य समोर आणावे तसेच संबंधित आरोपीला कोणताही विलंब न करता अटक करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस ठाण्याच्या परिसरात पत्रकारांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका पत्रकारांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही पत्रकारांनी सांगितले. “पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत. संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी,” अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्या पत्रकारांनी केली.

या आंदोलनामुळे सांगोला पोलीस ठाण्याच्या परिसरात लक्ष वेधले गेले असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे पत्रकारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments