सांगोल्यात पिकअपने दुचाकीला मागून जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी, चालकावर गुन्हा
सांगोला : महुद ब्रिजखाली भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. आदिक शांताराम पवार (वय २६) व विशाल मारूती जाधव (वय १३,
दोघेही रा. चाळीसधोंडा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हे शाईन कंपनीच्या मोटारसायकलवरून आटपाडीच्या दिशेने जात होते.
दरम्यान, महुद ब्रिजखालील परिसरात सांगोल्याकडून महुदच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
पिकअप वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या धडकेत आदिक पवार यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर १३ वर्षीय विशाल जाधव याच्या डाव्या पायाला तसेच डोक्याला गंभीर मार लागला.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने खासगी ॲम्बुलन्समधून उपचारासाठी सद्गुरू हॉस्पिटल, सांगोला येथे दाखल करण्यात आले.
या अपघातात दुचाकी आणि पिकअप वाहनाचे मिळून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी दीपक शेषराव जाधव (वय २६, रा. चाळीसधोंडा, ता. मंगळवेढा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक
अजय दत्तात्रय शिरतोडे (वय २६, रा. राजापूर, ता. खटाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महुद ब्रिज परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments