स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात सांगोल्यात एल्गार; १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर तुषार इंगळे व रविंद्र कांबळे यांचे उपोषण
सांगोला | प्रतिनिधी स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येत असल्याचा आरोप करत ही व्यवस्था रद्द करून पूर्वीप्रमाणे जुने मीटर
आणि छापील वीजबिले सुरू करण्याच्या मागणीसाठी तुषार इंगळे आणि रविंद्र कांबळे यांनी १५ ऑगस्ट रोजी
सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार कु. बाळूताई भागवत यांना सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरणने नागरिकांची पूर्वसंमती न घेता सांगोला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविले आहेत.
या मीटरनंतर अनेक ग्राहकांच्या वीजबिलात पूर्वीच्या तुलनेत हजारो रुपयांची वाढ झाल्याची तक्रार असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
स्मार्ट मीटर प्रणालीमुळे बिलाची रक्कम भरली नाही तर वीजपुरवठा तात्काळ खंडित होत असल्याने नागरिकांना वाढीव रक्कम भरावी लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अनेक कुटुंबांना ही रक्कम भरण्यासाठी कर्ज घ्यावे लागत असून त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, पूर्वीप्रमाणे घरपोच छापील वीजबिल देणे बंद झाल्याने मोबाईल किंवा ऑनलाइन सुविधेचा वापर करता न येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे पूर्वीप्रमाणे छापील वीजबिले पुन्हा सुरू करावीत, स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसवावेत तसेच दोन्ही मीटरमधील बिलातील फरक नागरिकांसमोर स्पष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच घरमालक किंवा दुकानमालकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविणाऱ्या संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांसाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर लोककलावंतांच्या सहभागातून पारंपरिक वाद्यांसह उपोषण करण्यात येणार असून,
मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही तुषार इंगळे आणि रविंद्र कांबळे यांनी दिला आहे.


0 Comments