बापू-आबांच्या कानगोष्टींनी सांगोल्यात राजकीय चर्चेला उधाण; नव्या समीकरणाची नांदी?
एकाच कार्यक्रमात शहाजीबापू पाटील–दीपकआबा साळुंखे-पाटील आमनेसामने; हस्तांदोलनानंतरच्या खास गप्पांनी कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या
सांगोला | प्रतिनिधी : सांगोल्याच्या राजकारणात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यानंतर राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे.
कार्यक्रमस्थळी दोन्ही नेत्यांचे झालेले हस्तांदोलन, त्यानंतर झालेल्या गप्पा आणि विशेषतः एकमेकांच्या कानात सुरू असलेल्या कुजबुजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दोन्ही नेत्यांमधील राजकीय संबंध सांगोल्याच्या राजकारणात कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. कधी एकमेकांना साथ, तर कधी थेट राजकीय संघर्ष, अशी दोन्ही नेत्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे.
२०१९ मध्ये साथ, २०२४ मध्ये पुन्हा संघर्ष
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला होता.
या राजकीय पाठिंब्यामुळे शहाजीबापूंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे मानले गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी विधानसभेचा कार्यकाळही एकत्रितपणे पूर्ण केला.
मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे बदलली. दोन्ही नेते पुन्हा वेगवेगळ्या राजकीय भूमिकेत दिसले आणि एकमेकांविरोधात राजकीय मैदानात उतरले. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला.
यानंतर सांगोला नगरपरिषदेसह स्थानिक राजकारणातील विविध निवडणुकांमध्येही दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
टीकेनंतर पुन्हा संवाद; नेमकं काय शिजतंय?
निवडणुकीच्या काळात एकमेकांवर राजकीय टीका करणारे हेच दोन नेते कार्यक्रमात मात्र अगदी सहजपणे संवाद साधताना दिसले. हस्तांदोलनानंतर दोघांमध्ये झालेल्या गप्पा आणि कानात झालेल्या चर्चेमुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
ही केवळ राजकीय सौजन्याची भेट होती की आगामी काळातील एखाद्या नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात? असा प्रश्न आता सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय निर्णय किंवा रणनीती आखली जात आहे का,
याबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ राजकीय अंदाज आणि कार्यकर्त्यांमधील चर्चेपुरत्याच मर्यादित आहेत.
सांगोल्याच्या राजकारणात 'कायमचा मित्र-कायमचा शत्रू' नाही?
सांगोल्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता राजकीय समीकरणे वेळोवेळी बदलताना दिसली आहेत. निवडणुकीच्या काळात एकमेकांविरोधात भूमिका घेणारे नेते निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र आल्याची उदाहरणेही सांगोलकरांनी पाहिली आहेत.
त्यामुळे शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या या भेटीकडेही राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले आहे. बापू-आबांच्या भेटीतील या कानगोष्टी भविष्यातील राजकीय मनोमिलनाची नांदी ठरणार का,
की हा केवळ योगायोगाने झालेला संवाद? याचे उत्तर आगामी काळातील राजकीय घडामोडींमधूनच स्पष्ट होणार आहे.
सध्या मात्र या एका भेटीने सांगोल्याच्या राजकारणात चर्चेला नवा विषय मिळाला असून, दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्येही या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.


0 Comments