सांगोला अर्बन बँकेचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात; ८ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांची मेजवानी
सामाजिक उपक्रम, प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगोला | प्रतिनिधी सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा सामाजिक बांधिलकी, जनजागृती, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक उपक्रम आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांची विविधांगी पर्वणी आयोजित करण्यात आली आहे.
८ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मिरज रोड येथील सांगोला अर्बन बँकेच्या महात्मा जोतिबा फुले सभागृहात विविध कार्यक्रम होणार आहेत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांची सुरुवात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता भ्रष्टाचारविरोधी जागरूकता कार्यशाळेने होणार आहे. रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत पुणे येथील पोलीस इन्स्पेक्टर
सौ. पल्लवी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार असून भ्रष्टाचारमुक्ती, पारदर्शकता आणि जबाबदार कारभार याबाबत त्या उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
११ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत महिलांसाठी पर्यावरणपूरक रांगोळी-मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सांगोला अर्बन बँक आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याच दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निवांत हराळे, अकलूज यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्याबाबत या व्याख्यानातून मार्गदर्शन मिळणार आहे.
१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता सातारा येथील श्री. वैभव केजळे यांचा ‘साज सांगता’ हा जुन्या-नव्या बहारदार भावगीतांचा सांगीतिक कार्यक्रम रसिकांसाठी सादर केला जाणार आहे.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला अर्बन बँक आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना बँकेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता वर्धापन दिनाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी महिला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण,
गुणवंतांचा सत्कार तसेच सांगोला अर्बन बँक परिवारातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
बँकेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विविध कार्यक्रमांना सभासद, खातेदार, महिला, युवक तसेच सांगोला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी,
असे आवाहन बँकेचे चेअरमन डॉ. प्रभाकर ए. माळी यांनी केले आहे. यावेळी बँकेचे चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सीए के. एस. माळी यांनीही कार्यक्रमांची माहिती दिली.


0 Comments