शिरभावी ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या कथित अपहाराचा आरोप; खोटी कागदपत्रे, बोगस विकासकामे, लेखापरीक्षण व गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणकर्ते मा. राजेंद्र मोहन होवाळ
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील शिरभावी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप करत गावातील रहिवासी राजेंद्र मोहन होवाळ (वय ३५) यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे.
या अर्जामध्ये सन २०२० पासून ग्रामपंचायतीत विविध विकासकामांच्या नावाखाली खोटी कागदपत्रे तयार करून, बोगस कामे दाखवून, शासनाच्या निधीचा कथित अपहार करण्यात
आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट), तांत्रिक चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अर्जदार राजेंद्र होवाळ हे शिरभावी गावचे कायमस्वरूपी रहिवासी असून मजुरी व शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याची माहिती शासनाच्या ऑनलाइन नोंदी व उपलब्ध कागदपत्रांमधून समोर आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, शिरभावी ग्रामपंचायतीमध्ये सन २०२० पासून विविध वित्त आयोग व शासनाच्या योजनांमधून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीचा योग्य वापर न करता खोटी बिले, बनावट कागदपत्रे आणि प्रत्यक्षात न झालेली विकासकामे दाखवून शासनाची
दिशाभूल करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही व्यक्ती व कंत्राटदारांच्या नावाने खोटी बिले सादर करून निधी परस्पर काढून घेतल्याचाही दावा करण्यात आला आहे.
अर्जात नमूद केलेल्या आरोपांमध्ये बंदिस्त गटार बांधकाम, रस्त्यांसाठी साहित्य खरेदी, मागासवर्गीय वस्त्यांसाठी डस्टबिन व कुंडी खरेदी, स्वच्छता कामे, होवाळ वस्ती पाणीपुरवठा योजना, गावठाणातील सिमेंट गटारे,
शाळांसाठी संगणक, प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर खरेदी, अंगणवाडी साहित्य, तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प व शौचालय उभारणी या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत तत्कालीन व विद्यमान सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांवर संगनमताने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून,
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन हिशोबापासून ते सर्व विकासकामांच्या खर्चापर्यंत प्रत्येक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजेंद्र होवाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सन २०२० पासून आजपर्यंतच्या सर्व विकासकामांचे लेखापरीक्षण, तांत्रिक
पडताळणी, खर्चाची तपासणी आणि संबंधित कागदपत्रांची सत्यता पडताळून दोषींवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे तक्रारदाराने केलेले आरोप असून संबंधित ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामविकास अधिकारी
किंवा अन्य संबंधितांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. या आरोपांची सत्यता सक्षम यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल.


0 Comments