मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या लोकनेते डॉ. गणपतराव देशमुख यांच्या आठवणी; संसदीय कार्यशैलीचा केला गौरव
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे आराध्य दैवत आणि जनतेच्या हितासाठी आयुष्यभर निःस्वार्थपणे कार्य करणारे ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉ. गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी
३० जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत विशेष स्मरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आपल्या आठवणी, भावना आणि आदरांजली व्यक्त करत आहेत.
या उपक्रमाच्या आजच्या पर्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. आबासाहेब देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना संसदीय लोकशाहीतील आदर्श नेतृत्व म्हणून अभिवादन केले.
त्यांनी आबासाहेबांची साधी राहणी, तत्त्वनिष्ठ राजकारण, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि संसदीय परंपरांप्रती असलेली निष्ठा यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या स्मरण उपक्रमासाठी आयोजकांना शुभेच्छा देत, स्व. आबासाहेबांचे विचार आणि लोकसेवेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांचे योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या स्मरण उपक्रमाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, विविध मान्यवरांच्या आठवणींमधून आबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक प्रेरणादायी पैलू जनतेसमोर येत आहेत.


0 Comments