वारीत विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मैदानात; २२ व २३ जुलै रोजी सांगोल्यात मोफत आरोग्यसेवा
सांगोला | प्रतिनिधी आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. निकिताताई देशमुख यांनी सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे.
बुधवार २२ जुलै आणि गुरुवार २३ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, सांगोला येथे वारकरी बांधवांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्यसेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारी संस्कृती आहे. याच भावनेतून डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. निकिताताई देशमुख हे स्वतः दोन दिवस
वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार असून, प्रवासामुळे थकलेल्या भाविकांना आवश्यक वैद्यकीय उपचार, औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहेत.
या उपक्रमादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहितीही वारकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे उपचारांसह शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याविषयीही जनजागृती होणार आहे.
खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरत आहे.
दरम्यान, या सेवाभावी उपक्रमात शेतकरी कामगार पक्ष तसेच पुरोगामी युवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


0 Comments