सांगोल्याच्या तहानेकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे; टेंभू, म्हैसाळ व नीरा कालव्यातून पाणी सोडण्याची दिपकआबांची मागणी
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन; पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची सूचना
सांगोला | प्रतिनिधी राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असताना, कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
सांगोला तालुक्यात मात्र पावसाने अद्यापही पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीपात्रातून वाहून जाणारे अतिरिक्त पुराचे पाणी टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून
सांगोला तालुक्याला तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात दीड महिना उलटूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.
शेतकऱ्यांसमोर पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, तलाव, कूपनलिका आणि अन्य जलस्रोत कोरडे पडल्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
दुसरीकडे कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हे अतिरिक्त पाणी योग्य नियोजनातून टेंभू योजनेद्वारे माणगंगा नदीत, म्हैसाळ योजनेद्वारे कोरडा नदीत तसेच नीरा उजवा कालव्यातून
सांगोला शाखा कालव्यात सोडल्यास तालुक्यातील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरतील. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागांचा समतोल विचार करून अतिरिक्त पाण्याचे प्रभावी नियोजन करावे व सांगोला तालुक्याला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणीही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली आहे.
चौकट : सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
"पूरग्रस्त भागातील अतिरिक्त पाणी दुष्काळी सांगोला तालुक्याकडे वळविल्यास दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
या विषयावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा."
— मा. दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार


0 Comments