महाराष्ट्र विधानपरिषदेला अनुभवी उपसभापती; सचिन आहीर यांच्या निवडीचे दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले स्वागत
सांगोला | तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नूतन उपसभापती सचिन आहीर यांचा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते विधानपरिषद उपसभापती दालनात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्याच्या संसदीय कामकाजाला अनुभवी, संयमी आणि सर्वांना विश्वासात घेऊन चालणारे नेतृत्व लाभल्याची भावना दिपकआबा यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, विधानपरिषद हे राज्याच्या लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे वरिष्ठ सभागृह असून, त्याच्या कामकाजात उपसभापतींची भूमिका निर्णायक असते.
सचिन आहीर यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव असल्याचे सांगत, ते अभ्यासू, शांत आणि सर्व पक्षांशी समन्वय साधणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी सचिन आहीर यांचे अनुभवपूर्ण नेतृत्व निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संसदीय परंपरा जपत सर्व पक्षांच्या सदस्यांना समान न्याय देणे, सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख ठेवणे तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, दलित आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नूतन उपसभापती सचिन आहीर यांनी दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे आभार मानले. राज्यहित आणि सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च मानत, निष्पक्षपणे, पारदर्शकपणे आणि संविधानिक मूल्यांचे पालन करत आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


0 Comments