वादळी पावसाचा सांगोला तालुक्याला तडाखा; सहा गावांतील सात घरांचे पत्रे उडाले
सांगोला प्रतिनिधी : तालुक्यात ५ जून रोजी सायंकाळपासून रात्रीपर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान केले.
जोरदार वाऱ्यामुळे सहा गावांतील किमान सात घरांवरील पत्रे उडून गेली असून अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तहसील प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी लोटेवाडी येथील मोरे वस्तीवर रात्री सुमारे ८.४७ वाजता आलेल्या वादळी
वाऱ्यामुळे उत्तम सुखदेव मोरे यांच्या घरावरील पत्रे उडून गेली. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले.
याचप्रमाणे सावे येथील जावीर वस्तीमध्ये सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळामुळे प्रभाकर तुकाराम जावीर यांच्या घराचे छप्पर उडाले.
तर चोपडी गावातील जयराम मळा परिसरात शिवाजी ज्ञानेश्वर बाबर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.
सोनंद येथील स्टेशन रोड परिसरातही वादळी वाऱ्याचा फटका बसला. येथे धोंडीराम कांबळे यांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने घराची हानी झाली.
दरम्यान, किडेबिसरी गावात रात्री सुमारे ९.१५ वाजता झालेल्या वादळामुळे
तानाजी तुकाराम रुपनर आणि धनाजी तुकाराम रुपनर यांच्या घरांवरील पत्रे उडून गेली. या दोन्ही कुटुंबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनांची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची प्राथमिक नोंद घेतली असून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या नियमांनुसार मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत नागरिकांची धावपळ उडाली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या.
हवामान विभागाने पुढील काही दिवस वातावरणात बदल राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


0 Comments