राजुरीच्या ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात धाडसी चोरी; २.४१ लाखांचे दागिने लंपास, सीसीटीव्हीत तीन संशयित कैद
सांगोला, प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल २ लाख ४१ हजार
रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आल्याने राजुरी गावासह परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी रात्री ८ वाजल्यापासून २० जून रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात तीन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि धार्मिक वस्तूंवर हात साफ केला.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे एक किलो वजनाचा, सोन्याचा मुलामा व सोन्याचे डोळे असलेला २ लाख १५ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा,
२२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ४ हजार रुपये किमतीचा पितळी पंचधातूचा घोडा यांचा समावेश आहे. एकूण चोरीचा ऐवज २ लाख ४१ हजार रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव (वय ५२, रा. राजुरी) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५, ३३१(४) आणि ३(५) अंतर्गत अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.


0 Comments