सांगोल्यात वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार! सोनंदच्या कोरडा नदीपात्रात ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई; जेसीबी जप्त, वाळूने भरलेला टेम्पोसह चालक फरार
सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. सोनंद येथील कोरडा नदीपात्रात सुरू असलेल्या
बेकायदेशीर वाळू उत्खननावर धाड टाकत सांगोला पोलिसांनी तब्बल ३३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १९ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास सोनंद परिसरातील चव्हाण मळा ते कोरडा नदीपात्राकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
छाप्यामध्ये योगेश सतीश बाबर (वय ३०, रा. सोनंद, ता. सांगोला) हा जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातून विना परवाना आणि शासनाची कोणतीही परवानगी
न घेता वाळूचा उपसा करत असल्याचे आढळून आले. उत्खनन केलेली वाळू चारचाकी टेम्पोमध्ये भरली जात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत अंदाजे ३० लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा जेसीबी जप्त केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच वाळूने भरलेला टेम्पो चालकासह घटनास्थळावरून पसार झाला. फरार वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात दखलपात्र अहवाल क्रमांक ५६२/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३०५(ई) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र पिराजी माळी यांनी फिर्याद दिली आहे.
सांगोला तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली
झालेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांविरोधात आगामी काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक नलवडे करीत असून अवैध वाळू उपशामागील इतर संबंधितांची भूमिकाही तपासली जात आहे.
कारवाईतील जप्त मुद्देमाल :
जेसीबी (विना नंबर) – अंदाजे किंमत ₹३०,००,०००
चारचाकी टेम्पो व भरलेली वाळू – अंदाजे किंमत ₹३,०७,०००
एकूण जप्त मुद्देमाल – ₹३३,०७,०००


0 Comments