Breaking News

सांगोल्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गैरसोय; हवा, पाणी व स्वच्छतागृहांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह

सांगोल्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गैरसोय; हवा, पाणी व स्वच्छतागृहांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे.

 मोफत हवा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा उपलब्ध करून देणे

 बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी या सेवा अपुऱ्या किंवा बंद अवस्थेत असल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.

पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एअर मशीन बसविण्यात आलेली असते.

 मात्र तालुक्यातील काही पंपांवर ही यंत्रणा नादुरुस्त किंवा बंद असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे चालकांना खासगी पंचर दुकानांचा आधार घ्यावा लागत असून अतिरिक्त खर्च आणि वेळेचा फटका बसत आहे.

यासोबतच पिण्याच्या पाण्याची सुविधाही अनेक ठिकाणी अपुरी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. उन्हाळ्याच्या काळात प्रवाशांना थंड व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, 

अशी अपेक्षा असते. मात्र काही पेट्रोल पंपांवरील वॉटर कुलर बंद असल्याने किंवा पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

दरम्यान, स्वच्छतागृहांची स्थितीही चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, पाण्याची कमतरता आणि देखभालीकडे

 दुर्लक्ष यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याचे प्रवासी त्रस्त होत आहेत. काही पंपांवरील स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसल्याचीही तक्रार करण्यात येत आहे.

ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटींवर पेट्रोल पंपांना परवाने दिले जातात. मात्र प्रत्यक्षात नियमांचे पालन कितपत होते,

 याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्राहकांच्या मते, अनेक ठिकाणी सुविधा फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्षात त्यांचा लाभ मिळत नाही.

तालुक्यातील नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपांची नियमित तपासणी करून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी केली आहे.

 ग्राहकांच्या मूलभूत हक्कांच्या दृष्टीने हवा, पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा सातत्याने

 कार्यरत ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट

"सुविधा असाव्यात केवळ दर्शनी नव्हे, तर प्रत्यक्ष वापरात"

पेट्रोल पंपांवर इंधनासोबतच ग्राहकांना आवश्यक सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. मात्र अनेक ठिकाणी या सेवा बंद किंवा

 अपुऱ्या असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments