Breaking News

काकाच ठरला पाच वर्षांच्या समर्थचा मारेकरी! पत्र्यावरून पडल्याचा बनाव; शवविच्छेदन अहवालातून उघड झाले सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक सत्य

काकाच ठरला पाच वर्षांच्या समर्थचा मारेकरी! पत्र्यावरून पडल्याचा बनाव;


शवविच्छेदन अहवालातून उघड झाले सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक सत्य

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्या समर्थचा खून त्याच्या सख्ख्या काकानेच केल्याचे तपासात समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत मुलाचे नाव समर्थ यल्लाप्पा कास्तार (वय ५) असे असून, तो आपल्या आजी शोभा बगले यांच्यासोबत बरुर येथे राहत होता.

 दरम्यान, त्याचा काका अंकुश परसाप्पा कास्तार (वय २५) हा देखील जवळच वास्तव्यास होता.

शुक्रवारी दुपारी अंकुशने समर्थला घरी बोलावून नेले. काही वेळानंतर त्याने बेशुद्ध अवस्थेतील समर्थला उचलून आणत, "तो पत्र्यावरून पडला आहे," 

असा दावा केला. कुटुंबीयांनी तातडीने समर्थला उपचारासाठी सोलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी समोर आलेल्या अहवालाने सर्वांनाच धक्का बसला. 

अहवालात समर्थचा मृत्यू पडल्यामुळे नसून गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काकाने रचलेला अपघाताचा बनाव उघड झाला.

घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आली असून संशयित आरोपी अंकुश कास्तार याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अंकुशने आपल्या निष्पाप पुतण्याचा खून कोणत्या कारणातून केला, याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी आजी शोभा बगले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे बरुर परिसरात शोककळा पसरली असून, "ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच काकाने जीव घेतला" अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments