सांगोला तालुक्यातील चोपडीत कुस्तीचा थरार; उरुसानिमित्त रंगला भव्य फड
चोपडी (ता. सांगोला) येथे पठाण साहेब बाबा दर्गा उरुसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या पंधरा वर्षांपासून परिसरातील मल्लांना
प्रोत्साहन देण्यासाठी या कुस्ती फडाचे आयोजन केले जाते. यंदाही स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या रोख बक्षिसांच्या कुस्त्या रंगतदार ठरल्या.
विशेषतः लहान मुलांच्या लढतींनी उपस्थितांची मने जिंकली आणि मैदानात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. बुधेहाळ, नाझरे, निमगाव,
जुनोनी, कारंडेवाडी आणि तिप्पेहाळी येथील विविध तालमींमधील पैलवानांनी सहभाग नोंदवून आपली ताकद आणि कौशल्य सादर केले.
स्पर्धेचे उद्घाटन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भिकाजी बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे समालोचन सुनील बाबर यांनी केले. कुस्ती फडामुळे ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



0 Comments