सांगोला ग्रामीण रुग्णालयात भ्रष्टाचाराचा आरोप; १२ मे रोजी रास्ता रोकोचा इशारा
स्वीपर व डॉक्टरांवर कारवाईची मागणी; आरोग्यमंत्र्यांना नगरसेवक सतीश सावंत यांचे निवेदन
सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कथित गैरप्रकारांमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शवविच्छेदनासाठी पैसे घेतल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला
जात नाही, तसेच रिपोर्ट देण्यासाठीही मोठ्या रकमेची मागणी केली जाते, असा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना लेखी निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
संबंधित निवेदनात स्वीपर धीरज भोरे यांच्यावर तसेच पैसे मागणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोपानुसार, रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी सुमारे 2 हजार रुपये घेतले जातात.
त्यानंतर रिपोर्ट मिळवण्यासाठी नातेवाईकांकडून 5 ते 10 हजार रुपयांची मागणी केली जाते.
पैसे दिल्याशिवाय रिपोर्ट देण्यात येत नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.
तसेच, रुग्णालयात नियमित वैद्यकीय सेवा व्यवस्थित मिळत नसल्याचीही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसतात, अशीही तक्रार आहे.
काही कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडील कामे केली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
याशिवाय, अॅम्ब्युलन्स सेवेतही कमिशनखोरी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास १२ मे २०२६ रोजी सकाळी
११ वाजता सांगोला–पंढरपूर मार्गावरील बिलेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


0 Comments