निरा कालव्यात वृद्धाचा मृतदेह सापडल्याने सांगोल्यात खळबळ
सांगोला तालुक्यातील हलदहिवडी परिसरात मंगळवारी (दि. 28 एप्रिल 2026) सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली.
निरा उजवा कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास डॉ. चौगुले यांच्या शेताजवळील कालव्यात हा मृतदेह दिसून आला.
स्थानिकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 60 ते 70 वर्षे दरम्यान असल्याचे सांगितले जात असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (रजि. नं. 64/2026) करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचा पाण्यात पडून
बुडाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मृतदेह कालव्यातून वाहत येऊन येथे अडकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलीस उपनिरीक्षक भारत वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
दरम्यान, नागरिकांनी या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास तातडीने सांगोला पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


0 Comments