Breaking News

गोंधळाला विरोध केल्याने संतापजनक प्रकार; गरोदर तरुणीची हत्या, अजन्म बाळाचाही मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील घटना..

गोंधळाला विरोध केल्याने संतापजनक प्रकार; गरोदर तरुणीची हत्या, अजन्म बाळाचाही मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील घटना..


सोलापूर / प्रतिनिधी : घरासमोर मोठ्याने गाणी लावून गोंधळ घालण्यास विरोध केल्याने एका गरोदर तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 

शहरातील अलकुंटे चौक परिसरात घडली आहे. या घटनेत नऊ महिन्यांच्या गर्भातील बाळाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोनी गणेश रामपुरे (वय १९, रा. अलकुंटे चौक, उत्तर सदर बझार, सोलापूर) असे मृत तरुणीचे नाव असून बापू सुरेश आरगोळ (वय २६) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी रामपुरे ही प्रसूतीसाठी माहेरी आली होती. 

रविवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास आरोपी बापू आरगोळ याने तिच्या घरासमोर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टमवर गाणी लावून गोंधळ घातला. 

यावेळी सोनीची आई लक्ष्मी म्हेत्रे यांनी मुलगी नऊ महिन्यांची गरोदर असल्याने आवाज कमी करण्याची विनंती केली.

मात्र, या विनंतीवरून संतापलेल्या आरोपीने उलट शिवीगाळ करत वाद सुरू केला. जुन्या वैमनस्यातून भांडण अधिक चिघळले. 

दरम्यान, सोनी वाद मिटवण्यासाठी मध्ये पडली असता आरोपीने तिचा गळा आवळत डोके भिंतीवर आपटले.

 यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष घटनेत तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments