सांगोला तालुक्यातील हाबिसेवाडी येथे उरूसातील गर्दीतून वाद;
लोखंडी रॉड-काठ्यांनी मारहाण, सहा जणांवर गुन्हा
सांगोला तालुक्यातील हाबिसेवाडी येथे गैबीपीर उरूसादरम्यान घडलेल्या किरकोळ धक्काबुक्कीने मोठा वाद पेट घेतल्याची घटना समोर आली आहे.
रविवारी (दि. २६ एप्रिल) मध्यरात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास ही मारहाणीची घटना घडली.
उरूसातील प्रचंड गर्दीत फिर्यादी खंडू नामदेव खरात यांचा विठ्ठल संदीपान खरात यांना चुकून धक्का लागला. याच कारणावरून “जाणूनबुजून धक्का देतोस का?” असा जाब विचारत वाद वाढला.
त्यानंतर विठ्ठल संदीपान खरात, शिवाजी संदीपान खरात, शंकर संदीपान खरात, दिगंबर शंकर खरात, विशाल मच्छिंद्र खरात आणि रामा केराप्पा करे (सर्व रा. हाबिसेवाडी) यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी मारहाण करत फिर्यादीसह काकासो खरात आणि ज्ञानेश्वर खरात यांना डोके,
हात व पाठीवर गंभीर दुखापती केल्या. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खंडू खरात यांनी संबंधित सहा जणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments