सांगोल्याला झटका! शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यातून नाव वगळलं; साताऱ्याची दमदार एन्ट्री
सोलापूर : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी देताच मोठा बदल समोर आला आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये आता सांगोला तालुक्याला वगळण्यात आले असून सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
पूर्वीच्या आराखड्यानुसार हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातून जात होता.
मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर नव्याने आखणी करण्यात आली असून
सांगोला आणि उत्तर सोलापूर तालुके पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. त्यामुळे सांगोल्यातील अनेक गावांवरून जाणारा मार्ग आता बदलण्यात आला आहे.
नवीन आराखड्यानुसार महामार्ग माढा आणि माळशिरस तालुक्यांकडे वळवण्यात आला
असून काही प्रमाणात बार्शी, मोहोळ आणि पंढरपूरमधील गावांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या बदलामुळे सातारा जिल्ह्याची जोरदार एन्ट्री झाली आहे. सोलापूरमधील गारवड परिसरातून हा
मार्ग साताऱ्यातील कारखेलमध्ये प्रवेश करणार असून पुढे खटाव तालुक्यातील भागातून सांगलीकडे मार्गक्रमण करणार आहे.
यामुळे माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रेही महामार्गाशी जोडली जाणार आहेत.
पूर्वी 802 किमी असलेला हा प्रकल्प आता 856 किमी लांबीचा सुधारित महामार्ग म्हणून अंतिम करण्यात आला आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मार्गात बदल करण्यात आले असून साताऱ्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
👉 सांगोल्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक पातळीवर याबाबत प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.


0 Comments