सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा बिगुल; ३५ गावांत ४७
जागांसाठी रणधुमाळी, आजपासून अर्ज दाखल सुरू!
सोलापूर : जिल्ह्यातील रिक्त सरपंच व सदस्यपदांसाठी होणाऱ्या ग्रामपंचायत पोट निवडणुकांचा शंखनाद
आज (७ एप्रिल) पासून झाला असून, ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींमधील ४७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
या निवडणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे १३ सरपंचपदांसाठी थेट जनतेतून निवड होणार आहे. याशिवाय ३४ सदस्यपदांसाठीही मतदान होणार आहे.
जात प्रमाणपत्र अवैध ठरणे, मृत्यू, राजीनामा तसेच अविश्वास ठराव यांसारख्या कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.
📍 या गावांत रंगणार निवडणूक
फटेवाडी, अनकढाळ, चिकमहूद, खवासपूर, पानिव, मंद्रुप, कोळेगाव, लोंढे, मोहितेवाडी, हंजगी, सुलतानपूर, कोन्हाळी, सलगर,
देवगाव, ईश्वर वठार, वांगी, कुसूर, जिंती, कात्रज, यावली, शंकरनगर यांसह एकूण ३५ गावांचा समावेश आहे.
🔥 राजकीय वातावरण तापणार
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच ग्रामीण भागात उमेदवारांची मोर्चेबांधणी, पळवापळवी आणि गाठीभेटींना वेग आला आहे. विशेषतः सरपंचपदाची थेट निवडणूक असल्यामुळे अनेक गावांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
📌 विशेष बाब
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी ग्रामपंचायतीची पूर्ण निवडणूक प्रक्रिया होणार आहे. २०२२ मध्ये निवडणूक झाल्यानंतर सरपंचासह सर्व सदस्यांनी अडीच वर्षांत राजीनामा दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
🗓️ असा आहे निवडणूक कार्यक्रम
७ ते १३ एप्रिल: उमेदवारी अर्ज स्वीकारणे (शनिवार-रविवार सुट्टी वगळून)
१५ एप्रिल: अर्ज छाननी (सकाळी ११ वाजल्यापासून)
१७ एप्रिल: निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी (दुपारी ३ नंतर)
२८ एप्रिल: मतदान (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
२९ एप्रिल: मतमोजणी
६ मे: निकाल अधिसूचना जाहीर
या पोटनिवडणुकांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार असून, कोणत्या गावात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments