“शेअर मार्केटच्या नादाने घेतला जीव! कर्जातून सुटण्यासाठी 75 वर्षीय आजीची थंड डोक्याने हत्या” सोलापूर जिल्हा हादरला
सोलापूर | प्रतिनिधी झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासाने शेअर मार्केटमध्ये अडकलेल्या एका तरुणाने थेट खुनाचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना बार्शीत उघडकीस आली आहे.
कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या भाडेकरूनेच आपल्या घरमालक वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी येथील गंगुबाई कालिदास गडदे (वय 73) या 25 मार्चपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्या एकट्याच राहत असून घरभाड्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता.
दोन दिवस शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत, त्यामुळे 27 मार्च रोजी नातेवाईकांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली. त्यात गंगुबाई या चांगदेव गोवर्धन पाटील
या भाडेकरूसोबत एका इमारतीत जाताना दिसल्या, मात्र बाहेर येताना कुठेच दिसल्या नाहीत. संशय बळावल्याने पोलिसांनी चांगदेव पाटीलला ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर पोलिसी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. 25 मार्च रोजी त्याने गंगुबाईंना घरी बोलावून
लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर टॉवेलने नाक-तोंड दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पिशवीत भरून कारमधून नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
धक्कादायक बाब म्हणजे, शेअर मार्केटमध्ये इंट्राडे व फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये मोठे नुकसान झाल्याने आरोपी प्रचंड कर्जबाजारी झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी आणि झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने गंगुबाईंच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी हा थरारक गुन्हा केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी बार्शी पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) व 238 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
👉 झटपट श्रीमंतीच्या हव्यासाने एका निरपराध वृद्धेचा जीव घेतल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.


0 Comments