खळबळजनक..सांगोला तालुक्यातील वाळू माफियांकडून शासकीय पथकावर हल्ला;
महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील जवळा परिसरात वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली आहे.
या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले असून, सरकारी वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळा मंडळात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज पहाटे सांगोल्याचे मंडळ अधिकारी महेश जाधव व त्यांचे सहकारी कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले.
पथकाला पाहताच वाळू तस्करांनी आक्रमक पवित्रा घेत पथकावर तुफान दगडफेक सुरू केली. वाळू माफियांनी केवळ दगडफेकच केली नाही, तर महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.
यावेळी तहसील कार्यालयाच्या शासकीय गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
महसूल कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन
आपल्या सहकाऱ्यांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
“कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होणे ही गंभीर बाब आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही
आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील,” अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून, वाळू माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


0 Comments