सोलापूर जिल्ह्यात खुल्या इंधन विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश, अफवांना आळा
सांगोला : सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरल्याने प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर खुल्या स्वरूपात (बाटली, कॅन, डबा आदींमध्ये) इंधन विक्रीस सक्त मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या निर्णयानुसार आता पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरले जाणार असून, कोणत्याही अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन देण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे.
संभाव्य गैरप्रकारांना आळा घालणे व सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. पंपांवरील सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवणे बंधनकारक करण्यात आले
असून, इंधन विक्रीची नोंद व्यवस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे सोपे होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंप चालक व संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पेट्रोलियम नियम २००२ नुसार ज्वलनशील पदार्थाची खुल्या स्वरूपात विक्री करणे बेकायदेशीर आहे.
तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले असून,
नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments