दमदार कामगिरी! सांगोला पोलिसांनी २४ तासांत उघड केला दहावीच्या पेपर चोरीचा गुन्हा
तांत्रिक तपास, गोपनीय माहितीच्या आधारे अल्पवयीन आरोपीचा शोध; चोरीचा मुद्देमाल जप्त
सांगोला तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा सांगोला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत उल्लेखनीय व धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.
या घटनेमुळे निर्माण झालेली खळबळ आणि पालक-विद्यार्थ्यांमधील चिंतेचे वातावरण लक्षात घेता पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने तपास करत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर सांगोला पोलीस ठाण्यात
गु.र.नं. २४५/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२९ (३), ३३४, ३०५ (अ) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगोला पोलिसांनी तात्काळ विविध शोध पथके तयार करून तपासाला सुरुवात केली. कस्टडी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते.
आरोपीने अत्यंत नियोजनपूर्वक इलेक्ट्रिक कटरचा वापर करून दरवाजा तोडल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहितीदारांचे जाळे व गोपनीय माहिती यांच्या आधारे संशयिताचा माग काढण्याचे काम सुरू केले.
अत्यंत बारकाईने तपास करत पोलिसांनी अखेर आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान समोर आले की, हा गुन्हा एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाने केला आहे.
संबंधित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक मोटारसायकल तसेच चोरीस गेलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेच्या
प्रश्नपत्रिका व तीन कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. या जप्तीमुळे प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपासासाठी मोठी मदत झाली आहे.
या संपूर्ण कारवाईदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,
अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली.
या कारवाईत सपोनि वाघे, सपोनि मोरे, पोसई पुजारी, पोसई पाटील, मपोसई चव्हाण, पोहेकॉ/१८१० वाघमोडे, पोहेकॉ अस्लम काझी, पोहेकॉ वजाळे, पोहेकॉ राजगे, पोहेकॉ सावंत, पोहेकॉ प्रमोद गवळी, पोहेकॉ संतोष देवकर, पोहेकॉ/२६४ क्षीरसागर, पोहेकॉ/१२२८
जाधव, पोना/८३५ लेंगरे, पोकॉ/१२६२ पाटील, पोकॉ मारुती पांढरे, पोकॉ माळी, पोकॉ कुंभार, पोकों राजू आवटे, पोकॉ अमोल वाडकर, पोकॉ रमेश सुर्यवंशी, पोना इरकर, पोकों/३३५ वाघमोडे या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मोरे हे करत असून या प्रकरणामागील इतर कोणतेही दुवे किंवा संभाव्य सहकारी आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे सांगोला पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला असून सर्व स्तरातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रातील गुन्ह्याचा इतक्या कमी वेळात उलगडा केल्यामुळे पोलिसांच्या दक्षतेचे व कार्यक्षमतेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.


0 Comments