७४ वा वर्धापन दिन : संघर्षातून उभारलेले विध्यामंदिर संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
३ मार्च १९५२ हा दिवस सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. या दिवशी थोर स्वातंत्र्य सेनानी,
देशभक्त गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांनी स्थापन केलेल्या सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून विद्यामंदिर प्रशालेची स्थापना झाली.
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याच्या उदात्त हेतूने उभारलेले हे ज्ञानमंदिर आज ७४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
अडचणींतून उभे राहिलेले विद्यामंदिर
संस्थेच्या स्थापनेनंतर शिक्षणाची गंगा गावात आणण्याचा निर्धार करण्यात आला; मात्र सुरुवातीच्या काळात जागेची मोठी अडचण होती.
१९५२ साली संस्थेने शाळेचे वर्ग भरविण्यासाठी नगरपालिकेकडे जागेची मागणी केली. त्यानंतर तत्कालीन नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर
करून ग्रामदैवत श्री अंबिका मंदिरानजीकची जागा भाडे तत्वावर संस्थेला उपलब्ध करून दिली. (तेंव्हापासून आजही सदर जागेतच वर्ग भरत आहेत.)
सुरुवातीच्या काळात अंबिका मंदिरातच वर्ग भरवले जात होते. त्यानंतर मंदिरानजीकच्या पडक्या, रिकाम्या धर्मशाळेत वर्ग हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षणासाठी आसुसलेल्या विद्यार्थ्यांना जागेची कमतरता अडसर ठरू नये, हा त्या काळातील कार्यकर्त्यांचा निर्धार होता.
इमारत उभारण्यासाठी निधी नव्हता; पण जिद्द होती. संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी स्वतः श्रमदान करून मातीच्या विटा पाडण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या प्रेरणेने शिक्षक, पालक
व गावकऱ्यांनीही हातभार लावला आणि या श्रमसंस्कारातून विद्यामंदिराची पहिली इमारत साकार झाली. त्याग, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचे ते तेजस्वी उदाहरण आजही प्रेरणादायी आहे.
वाढता विस्तार, वाढती कीर्ती
७४ वर्षांच्या कालखंडात विद्यामंदिर प्रशालेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज येथे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुमारे १५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कर्तव्यदक्ष सेवेमुळे संस्थेचा गाडा समर्थपणे पुढे नेत आहेत.
गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्तबद्ध वातावरण आणि सर्वांगीण विकासाची भूमिका यामुळे विद्यामंदिर प्रशाला तालुक्यातील अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून ओळखली जाते.
आजची प्रशस्त व सुसज्ज इमारत, आधुनिक सुविधा, बास्केटबॉल मैदान, इनडोअर क्रीडांगण, प्रयोगशाळा व विविध उपक्रम
यांमुळे विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांना शहरातील सुविधांच्या तोडीस तोड वातावरण देण्याचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे.
विद्यामंदिरचे पुजारी : सेवाकार्याचा गौरवग्रंथ
या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने लेखक प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी संस्थेतील ७५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्यावर आधारित
‘विद्यामंदिरचे पुजारी’ हा गौरवग्रंथ सिद्ध केला आहे. चार दशकांहून अधिक काळ संस्थेच्या कार्याचा साक्षीदार असलेल्या लेखकाने आपल्या स्मरणरंजनातून व अनुभवातून या कार्यकर्त्यांच्या समर्पित सेवेचे शब्दांकन केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या शुभहस्ते आणि डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे. ही घटना संस्थेच्या इतिहासातील अभिमानास्पद पर्व ठरणार आहे.
परंपरेचा अभिमान, भविष्याची दिशा
विद्यामंदिर प्रशालेचा इतिहास हा केवळ इमारतींचा किंवा आकड्यांचा नाही; तो मूल्यांचा, संस्कारांचा आणि गुणवत्तेच्या सातत्यपूर्ण ध्यासाचा इतिहास आहे.
हजारो विद्यार्थी येथे घडले, समाजात विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आणि संस्थेचे नाव उज्ज्वल केले. या यशामागे शिक्षकांची निष्ठा, व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि पालकांचा विश्वास यांचा मोठा वाटा आहे.
अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना ही संस्था नव्या उंची गाठण्याचा संकल्प करत आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात तंत्रज्ञानसुसज्ज शिक्षण, कौशल्यविकास, क्रीडा व संस्कार या सर्व अंगांनी विद्यार्थ्यांचा विकास साधण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
७४ वर्षांचा हा प्रवास म्हणजे संघर्षातून साकारलेली यशोगाथा आहे. अंबिका मंदिरातील त्या साध्या वर्गापासून ते आजच्या भव्य कॅम्पसपर्यंतचा प्रवास हा सांगोला तालुक्याच्या सामाजिक जाणीवेचा
आणि शिक्षणप्रेमाचा साक्षीदार आहे. या ज्ञानमंदिराने पेटवलेली ज्योत पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरो, हीच वर्धापन दिनी कृतज्ञ भावनेतून व्यक्त होणारी शुभेच्छा.


0 Comments