सांगोला शहरात अचानक नाकाबंदी दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे, चारचाकी वाहन चालवताना
सीट बेल्ट न लावणारे चालक, तसेच नंबर प्लेट नसलेली किंवा नियमबाह्य नंबर प्लेट असणार्या वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई; पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा दबंग अंदाज
सांगोला : सांगोला शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे
यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. ३ मार्च रोजी अचानक नाकाबंदी करून मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली.
शहरातील वासूद चौक परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणारे चालक, तसेच नंबर प्लेट नसलेली किंवा नियमबाह्य नंबर प्लेट लावलेली वाहने आढळून
आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनचालकांना पोलिसांनी थांबवून त्यांची तपासणी केली.
याशिवाय मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
यामुळे रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
सांगोला शहरात काही वाहनचालकांकडून मोठ्या आवाजाचे बुलेट मोटारसायकल सायलेन्सर वापरले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत होत्या.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत नियमबाह्य व मोठ्या आवाजाचे बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्याची कारवाई केली. तसेच मोठ्या आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अनधिकृत बोर्ड व फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.
अचानक करण्यात आलेल्या या नाकाबंदीमुळे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अनेकांनी नियमांचे पालन करण्याची गरज असल्याची जाणीव व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या धडक कारवाईमुळे सांगोला शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांकडूनही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.



0 Comments