30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाचा इशारा; मेघगर्जना, गारपीट शक्य – शेतकरी सतर्क राहा!
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा अचानक बदल होण्याची शक्यता
असून 30 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह वादळी पावसाचे सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या कालावधीत अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस,
विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा धोका अधिक राहणार आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल जाणवू शकतो.
31 मार्च रोजी तुलनेने पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता असली, तरी काही भागांत अस्थिर हवामान कायम राहू शकते.
दरम्यान, 1 ते 4 एप्रिल या कालावधीत पुन्हा वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत.
वादळी वारे आणि संभाव्य गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.
स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून, पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच दैनंदिन कामांचे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.


0 Comments