मोठी बातमी..आधी निवडी पंचायत समिती सभापतींच्या; मगच ZPचे अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरणार
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर होऊन उद्या (सोमवार, ता. 23 फेब्रुवारी) 15 दिवस पूर्ण होत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी कधी होणार?
याची मोठी उत्सुकता असतानाच झेडपी, पंचायत समिती पदाधिकारी निवडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे. उद्या (सोमवार) किंवा मंगळवारी (ता. 24) निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंचायत समिती (Panchayat Samiti ) सभापती आणि उपसभापतींच्या निवडी अगोदर होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडेच पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीची जबाबदारी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांपैकी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, माढा या सात ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला आहे.
करमाळ्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला बहुमत मिळाले आहे. पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व तीर्थक्षेत्र विकास आघाडीला समान जागा मिळाल्या आहेत.
माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व त्यांच्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. सांगोल्यात सांगोला तालुका विकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
सभापती व उपसभापतींच्या निवडी आधी होतील, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी होतील, अशीच शक्यता आहे. उद्या (सोमवार), किंवा मंगळवारी (ता. २४) निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशीच शक्यता आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील ११ पैकी १० पंचायत समित्यांवर भाजपचा सभापती होईल, असे सूतोवाच केले आहे.
सभापती निवडीपूर्वी भाजप आपल्या पंचायत समिती सदस्यांची गटनोंदणी करण्याच्या तयारीत आहे. गटनोंदणीच्या माध्यमातून सभापती निवडीपूर्वीची आवश्यक ती कायदेशीर बांधणी केली जात आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवे कारभारी
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली जाते. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी स्वत: जातात की अन्य कोणत्या
अधिकाऱ्याला प्राधिकृत करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना नवे कारभारी मिळण्याची दाट शक्यता आहे.


0 Comments