धक्कादायक..सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना सांगोला तालुक्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधाऱ्यांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेत केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
१३१८.५२ दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेपैकी सध्या अवघे ७८.६१ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बंधाऱ्यांमध्ये भरघोस साठा झाला होता. त्यावर विश्वास ठेवून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी ज्वारी, मका,
ऊस, गहू, हरभरा तसेच डाळिंबासारख्या नगदी व फळपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे सिंचनासाठी पाण्याचा उपसा वाढला असून, साठा झपाट्याने घटत आहे.
परिणामी पिके व फळबागांच्या भवितव्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ऊस पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
परंतु सध्या पाणीसाठा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान खवासपूर, लोटेवाडी, बलवडी, नाझरा, अनकढाळ, सांगोला, सावे, आलेगाव आणि मेडशिंगी येथील नऊ बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. काही ठिकाणी बंधाऱ्यांचे दरवाजे काढल्याने उरलेले पाणीही वाहून गेल्याची नोंद आहे.
ग्रामीण भागातील विंधन विहिरींची पाणीपातळी घटत असून, काही गावांत पिण्याच्या पाण्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
डाळिंबासारख्या दीर्घकालीन फळपिकांवर पाण्याअभावी मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी महिन्यातच टंचाईची चाहूल लागल्याने पुढील तीन-चार महिन्यांसाठी काटेकोर जलव्यवस्थापनाची गरज अधोरेखित होत आहे.
शेतकऱ्यांच्या आशा आता नीरा उजवा कालवा, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनावर टिकून आहेत. वेळेत आवर्तन मिळाल्यास पिकांना दिलासा मिळेल; अन्यथा तालुक्यातील कृषी अर्थकारणासमोर गंभीर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
बंधाऱ्यांतील सद्य:स्थिती (दशलक्ष घनफूट/टक्केवारी)
चिनके २.२४ दशलक्ष घनफूट (४.५६ टक्के)
वाटंबरे १.७७ दशलक्ष घनफूट (३.४७ टक्के)
कमलापूर १७.६८ दशलक्ष घनफूट (१५.७१ टक्के)
वासूद (अकोला) ३.७७ दशलक्ष घनफूट (५.०९ टक्के)
कडलास ४.९९ दशलक्ष घनफूट (७ टक्के)
वाढेगाव ८.३८ दशलक्ष घनफूट (१०.३४ टक्के)
बामणी १०.३१ दशलक्ष घनफूट (१०.४५ टक्के)
मांजरी १८.३७ दशलक्ष घनफूट (२७.१८ टक्के)
मेथवडे ११.१० दशलक्ष घनफूट (१५.६४ टक्के)
अन्य ६.५१ दशलक्ष घनफूट (२२.६२ टक्के)
पाच तलावांत ५३ टक्के साठा शिल्लक
सांगोला तालुक्यातील चिंचोली, अचकदाणी, जवळा, घेरडी आणि हंगीरगे या पाच तलावांची एकूण साठवण क्षमता ३६०.५६ दशलक्ष घनफूट आहे. सध्या या तलावांत १९९.४६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
चिंचोली तलावात ६४.९१ दशलक्ष घनफूट, अचकदाणी तलावात १९.९९ दशलक्ष घनफूट, जवळा तलावात ३०.३८ दशलक्ष घनफूट,
घेरडी तलावात ७७.१२ दशलक्ष घनफूट व हंगीरगे तलावात ७.०६ दशलक्ष घनफूट साठा आहे.


0 Comments