माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा 'व्हायरल;
उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर: बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन नवीन आराखडा तयार करण्याची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. आता या नव्या आराखड्यातील बाधित गावांची यादी व्हायरल झाली आहे.
या यादीच्या सतत्येबाबत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले असून निवडणुकीनंतर अधिसूचना जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग पूर्वी धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेश करत होता.
त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मोजक्या गावातून मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करत होता.
या महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा व पंचगंगा नदीकाठचा मोठ्या प्रमाणात बागायती जमिनीचा पट्टा बाधित होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला.
दुसऱ्या बाजूला नागपूर- रत्नागिरी हा महामार्ग हा पूर्वीच्या आराखड्यातील शक्तिपीठ महामार्गाला अगदीच समांतर असल्याने सातारा जिल्ह्याचा
नव्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातून चंदगडमार्गे पुन्हा दोडामार्ग तालुक्यात बांद्याजवळून गोव्यात प्रवेश करणार आहे.
असा नवा आराखडा सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल गावांची यादी पाहता हाच नवीन मार्ग असू शकतो, असा तज्ज्ञांनी अंदाज वर्तविलेला आहे.
अधिकारी म्हणतात...
समाज माध्यमातील व्हारयल यादी सत्य आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र रस्ते विकास
महामंडळाच्या (एमएसआरडीसी)च्या अधिकाऱ्यांना विचारला असता. आमच्याकडे अधिकृत कोणतीही माहिती आलेली नाही.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर अधिकृत यादी गटनंबरसह जाहीर होईल. तशी अधिसूचनाच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांमध्ये घबराट
बाधित शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला चौपट दराने मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी तो रेडिरेकनरच्या चौपट आहे.
या जमिनींचा रेडीनेकर अत्यंत कमी असल्याने मिळाणारा मोबदला चालू बाजारभावापेक्षा अत्यंत कमी मिळतो.
यापूर्वी सुरत-चेन्नई या महामार्गातील बाधित शेतकऱ्यांसह पूर्वीच्या शक्तिपीठबाधित शेतकऱ्यांमुळे सर्वांना माहिती झालेले आहे.
यामुळे व्हायरल यादीतील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
नव्या यादीतील जिल्ह्यातील गावे
बार्शी तालुका : रातजंन, सर्जापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा.) दहिटणे, तडवळे. मोहोळ : वाळूज (दे.) भैरववाडी, देगाव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेटफळ, बैरागवाडी. माढा तालुका : धानोरे, बुद्रकवाडी,
मानेगाव, पाचफुलवाडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव (खे.) मोडनिंब, बैरागवाडी. पंढरपूर तालुका : बार्डी, करंकब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, अव्हे.
माळशिरस तालुका : जाबुंड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव (म.) चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी, गारवाड.
ठळक बाबी
पूर्वीच्या बाधित तालुक्यापैकी उत्तर सोलापूर व सांगोला वगळले
नवीन बाधित तालुक्यात माढा व माळशिरस तालुक्यांचा समावेश
बार्शीतील अंशत: तर मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील बाधित गावांमध्ये बदल
पूर्वीच्या आराखड्यात जिल्ह्यातील ५२ तर नवीन आराखड्यात ४२ गावे बाधित


0 Comments