पंतप्रधान मोदींच्या पत्नी परळीत, धनंजय मुंडेंनी केलं स्वागत; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
बीड: जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी आणि पंतप्रधानांचे
बंधू अशोक मोदी यांनी मंगळवारी तीर्थक्षेत्र परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भेट दिली.
अतिशय साध्या वेशभूषेत आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी प्रभू वैद्यनाथांची विधीवत पूजा आणि आरती केली.
सोमवारी सकाळी जशोदाबेन मोदी आणि अशोक मोदी यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात पूजा पार पाडली.
जशोदाबेन यांनी अत्यंत श्रद्धेने प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले आणि पुष्प अर्पण केले. जशोदाबेन मोदी यांनी प्रभू वैद्यनाथांकडे देशातील सुख-समृद्धी आणि जन-कल्याणासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आणि साधेपणा पाहून मंदिर परिसरात उपस्थित असलेले भाविक भारावून गेले होते.
कोणतीही बडेजाव न ठेवता एका सामान्य भाविकाप्रमाणे त्यांनी रांगेत उभे राहून घेतलेले दर्शन परळीत चर्चेचा विषय ठरले.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं स्वागत
सुरुवातीला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जशोदाबेन मोदी यांचे स्वागत केलं. या भेटीदरम्यान मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी, स्थानिक भाविक आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात होता.
जशोदाबेन मोदी यांच्या या आध्यात्मिक भेटीमुळे परळी वैजनाथ मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.


0 Comments