google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...दिराच्या लग्नाची तयारी राहिली अधुरीच! भरधाव डंपरने महिलेला चिरडले; मुलगी पाहण्यासाठी जाताना...

Breaking News

धक्कादायक ...दिराच्या लग्नाची तयारी राहिली अधुरीच! भरधाव डंपरने महिलेला चिरडले; मुलगी पाहण्यासाठी जाताना...

धक्कादायक ...दिराच्या लग्नाची तयारी राहिली अधुरीच!


भरधाव डंपरने महिलेला चिरडले; मुलगी पाहण्यासाठी जाताना...

मीरज (सांगली) : शहरातील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या शासकीय रग्णालयासमोर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली. 

नंदिनी मच्छिंद्र दोलतडे (वय ३३, मूळ रड्डे, ता. मंगळवेढा, सध्या रा. संजयनगर, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे.

या अपघातात मनोजकुमार कृष्णदेव दोलतडे (मूळ रा. रड्डे, सध्या रा. शिरूर, पुणे) यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार डंपरचालक सूरज चंद्रकांत पाटील (रा. बामणोली, ता. मिरज) याच्याविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत नंदिनी दोलतडे या मिरजमार्गे सांगोल्याला त्यांच्या दिरासमवेत जात होत्या.

 शिरूर (जि. पुणे) येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या दिराला लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सांगोला तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील बुर्लीवाडी येथे दोघे जात होते.

काल सकाळी सव्वादहाच्या सुमारास शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ त्यांची दुचाकी आली असता, पाठीमागून आलेल्या भरधाव वेगात असलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. यात दोघेही रस्त्यावर खाली पडले.

यावेळी नंदिनी या डंपरच्या चाकाखाली गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व यातच त्यांचा मृत्यू झाला; तर मनोजकुमार हे जखमी झाले. 

छत्रपती शिवाजी महाराज मार्गापासून पंढरपूर रोडपर्यंत रस्त्याचा दर्जा सुधारल्याने आता अवजड वाहनेही भरधाव वेगात असतात. वेगावर नियंत्रण नसल्यानेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

दिराच्या लग्नाची तयारी राहिली अधुरी...

मृत नंदिनी या मूळच्या मंगळवेढा तालुक्यातील असल्या; तरी सध्या संजयनगर येथे राहण्यास होत्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर पंचायत समितीत नोकरीस असलेल्या दिरासाठी मुलगी पाहण्यासाठी त्या जात होत्या. 

सांगोल्याच्या दिशेने दोघे जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे त्यांची दिराच्या लग्नाची तयारी अधुरीच राहिली.

Post a Comment

0 Comments