मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीतील एजंट सोलापूरचा;
मोबाईल लोकेशनवरुन कृष्णा सोलापुरात पकडला; अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कृष्णाने नावापुढे लावली डॉक्टरची पदवी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर/चंद्रपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांची किडनी विक्री प्रकरण समोर आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणात विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले
असून पीडित रोशन कुडे यांना कंबोडियात किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट 'डॉ. कृष्णा' उर्फ मल्लेशला पोलिसांनी अटक केली आहे.
तो मूळचा सोलापूरचा रहिवासी असल्याचे समोर आले असून 'डॉ. कृष्णा' या बनावट नावाने तो लोकांना फसवत होता. कृष्णा हा अभियंता असून त्याचे खरे नाव मल्लेश असल्याचे समजते.
धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्वतःचीही किडनी विकली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकनंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यापर्यंत (सोलापूर) पोहोचले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात किडनी विकली. फेसबुकवरील 'किडनी डोनर कम्युनिटी' या पेजच्या माध्यमातून तो एका व्यक्तीच्या संपर्कात आला.
आपण चेन्नई येथील असून व्यवसायाने डॉक्टर असल्याचे त्याने कुडे यांच्या गळी उतरविले. त्यानंतर डॉ. कृष्णा आणि कुडे व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते.
आठ लाख रुपयांत किडनी विकण्याचा निर्णय झाल्यानंतर कंबोडियाला जाण्यापूर्वी कोलकता विमानतळावर या दोघांची पहिली आणि शेवटची भेट झाली. किडनी विक्रीनंतर ते एकमेकांच्या बराच काळ संपर्कात होते.
देशभरातील किडनी विक्रीचे समोर येईल जाळे
दरम्यान, किडनी विक्री प्रकरणात सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मानवी अवयवांची तस्करी, या दिशेने तपास वळाला. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक गठित करण्यात आले.
सात दिवस लोटूनही तपास पथकाला कोणताही सुगावा मिळाला नव्हता. मात्र, रविवारी (ता. २१) डॉ. कृष्णाला सोलापुरातून रात्री उशिरा अटक करण्यात आली. तपासात 'डॉ. कृष्णा' हे त्याचे बनावट नाव असल्याचे समोर आले.
तो व्यवसायाने इंजिनिअर असल्याचे समजते. तो आर्थिक विवंचनेत होता. त्याने कापडाचा व्यवसायही केला होता, मात्र तो बुडाला. त्यातून त्याने स्वतःची किडनी विकली. त्याचे खरे नाव मल्लेश आहे.
त्यानंतर तो किडनी विक्रीच्या रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करू लागला. त्याने कुडे यांच्यासह आणखी किती जणांना आपल्या जाळ्यात अडकवले,
याचा तपास सुरु आहे. यापूर्वीच राजस्थान, हरियाना, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि बांगलादेशातील पीडितांनी कंबोडियात किडनी विकल्याचे समोर आले आहे.
आता डॉ. कृष्णा तपास यंत्रणेच्या हाती लागल्याने किडनी विक्रीचे देशभरातील जाळे उघड होऊ शकते. मात्र, अटकेतील डॉ. कृष्णाच्या खऱ्या नावाबाबत तपास यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.
दरम्यान, एक पथक पश्चिम बंगाल येथे गेले आहे. तिथे एका आरोपीने वेळेवर लोकेशन बदलल्याने तो हाती लागला नाही. ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा डॉ. कृष्णाला न्यायालयात हजर करण्यात आले.
डॉ. कृष्णा असा मिळाला....
या संपूर्ण प्रकरणात रोशन कुडे हे डॉ. कृष्णा नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात होते. त्या व्हॉट्सॲप क्रमांकाचे सिमकार्ड कुणाच्या नावावर आहे, याची माहिती मोबाईल कंपनीकडून मिळविण्यात आली.
तेव्हा 'डॉ. कृष्णा' हे नावच बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या क्रमांकाचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस केले. जेव्हा कुडे आणि डॉ. कृष्णा यांच्यात संपर्क व्हायचा, तेव्हा तो क्रमांक सोलापुरातच असल्याचे आढळले.
त्यामुळे डॉ. कृष्णा चेन्नईचा नव्हे, तर सोलापूरचा असल्याची खात्री पटली. त्याचे लाईव्ह लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी रविवारी (ता. २२ डिसें.) रात्री त्याला सोलापुरातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.


0 Comments