अचकदानी तलावा जवळ पक्षी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करा, पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - अचकदानी (ता.सांगोला) या गावाला तेथील निसर्ग संपन्नता, पक्षी वैभव, तलाव परिसर व तेथील निरव शांतता यामुळे विशिष्ट ओळख प्राप्त आहे.
अचकदानी वनविभाग परिक्षेत्रातील वनराईने समृद्ध रोपवाटिका व जलसंधारणातून समृद्ध असा जलाशय विविध स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांना आकर्षित करीत असतो.
म्हणून येथे तलावाच्या जवळ पक्षी निरीक्षणासाठी महाराष्ट्र शासन व वन विभागाकडून निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून होत आहे.
सांगोल्यातील पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे व प्रा.डॉ.विधीन कांबळे हे पक्षी निरीक्षणासाठी अचकदानी येथे गेले असता त्यांना स्वर्गीय नर्तक या पक्षाच्या नर व मादीचे दर्शन झाले. प्रौढ नराचा रंग पांढरा असून डोके व त्याच्यावरील तुरा काळा व चमकणारी निळसर छटा असणारा असतो.
प्रौढ नराची लांबी ही २० ते ३० सेंटिमीटर इतकी असते. अप्रौढ नराचा रंग तांबूस-तपकिरी असतो व त्याच रंगाची लांब शेपूट असते. मादी तांबूस तपकिरी असून शेपूट आखूड असते. डोक्यावरील तुरा लहान असतो.
हे पक्षी गर्द झाडीचे ठिकाण, जलाशय, ओढे, तलाव, यांच्याजवळ दिसून येतात. कीटक भक्षी असणाऱ्या या पक्षांचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या पूर्वार्धात सुरू होतो. हा पक्षी भारताच्या नैऋत्येकडील प्रदेशात स्थानिक व इतर भागात स्थलांतरित आहे.
अचकदाणी परिसरात स्वर्गीय नर्तक आढळल्याने निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. म्हणून याठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करण्याची मागणी होत आहे.
स्वर्गीय नर्तक या पक्षाला त्याच्या नराच्या शुभ्र पांढऱ्या रंगामुळे दुधराज असेही संबोधले जाते. हा पक्षी मध्य प्रदेश या राज्याचा राज्यपक्षी आहे.
या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या नराची लांब सडक पांढरी शेपूट. हा पक्षी हवेत उडत असताना या लांब सडक शेपटीच्या हवेत उडणाऱ्या रिबिनी प्रमाणे दिसणाऱ्या विशिष्ट हालचालींमुळे याला स्वर्गीय नर्तक हे नाव प्राप्त झाले आहे.
स्वर्गीय नर्तक या पक्षाची सांगोला तालुक्यातील ही प्रथमच नोंद आहे. यापूर्वी इथे स्थलांतरित लाल सरी बदकेची शेकडोच्या संख्येने थव्याची नोंद २०२३ मध्ये केली आहे. या स्थलांतरित पक्ष्याच्या आढळण्यामुळे अचकदानीच्या पक्षी वैभवात भर पडली आहे.
- प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, पक्षी अभ्यासक, सांगोला
पक्ष्यांना निसर्गातील हवामान बदलाचे जन्मजात ज्ञान असते. सध्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन होणाऱ्या हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावरही परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.
स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला आययूसीएन रेड लिस्टमध्ये सर्वात कमी चिंताजनक म्हणून सूचीबद्ध केले आहे. अधिवासाचा नाश, विखंडन आणि ऱ्हास, तसेच हवामान बदल हे प्रमुख घटक या पक्षांच्या अस्तित्वासाठी संभाव्य धोके आहेत.
- प्रा.डॉ.विधीन कांबळे, पक्षी अभ्यासक, सांगोला


0 Comments