खळबळजनक..सांगोल्यात विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद;
स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ व्या युवा महोत्सवाचे आज (मंगळवारी) सांगोला महाविद्यालयात उद्घाटन पार पडले.
त्यावेळी तेथे आलेल्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना स्टेजवर बोलावून मानपान न दिल्याने वाद झाला.सदस्य सत्कार न स्विकारताच नाराज होऊन तेथून परतले.
प्रत्येक युवा महोत्सवासाठी विद्यापीठाकडून निधी दिला जातो. व्यवस्थापन परिषद ही सर्वोच्च असून तेथील सदस्य तो निधी मंजूर करतात. तरीदेखील, महोत्सवाच्या उद्घाटनात त्या
सदस्यांना मानपान दिला जात नसेल तर ते दुर्दैवी आहे. उद्घाटनाला कुलगुरुंसह ठराविक अधिकारी आणि संस्थेचे काही पदाधिकारीच स्टेजवर होते.
अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे पाच-सहा सदस्य उपस्थित होते, त्यांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करावा, एवढीच माफक अपेक्षा होती. मात्र, तसे न करता
मोजक्या अधिकाऱ्यांनीच महोत्सवाचे उद्घाटन उरकले. त्यावर नाराजी व्यक्त करत राजा सरवदे, डॉ. विरभद्र दंडे, चन्नवीर बंकुर, मल्लिनाथ शहाबादे आदी सदस्य तेथून निघून आले.
यासंदर्भात प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
...म्हणून आम्ही तेथून निघून आलो
आतापर्यंतच्या युवा महोत्सवात विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषदेसह अन्य सदस्यांना व युवा महोत्सवाच्या कमिटीतील सर्व अधिकाऱ्यांना सन्मानाने स्टेजवर बोलावले जायचे.
त्यांचा सन्मान केला जात होता, पण सांगोल्यातील २१ व्या युवा महोत्सवात तसा सन्मान दिला गेला नाही. त्यामुळे आम्ही महोत्सवाचे उद्घाटन सोडून तेथून निघून आलो.
- राजा सरवदे, सदस्य, व्यवस्थापन परिषद
गुरुवारच्या बैठकीत गोंधळाची शक्यता
गुरुवारी (ता. ९) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. ४ ऑक्टोबरच्या बैठकीतही विविध विषयांवरून
कुलगुरू व काही सिनेट सदस्यांमध्ये जुंपली होती. आता युवा महोत्सवातील उद्घाटनावेळीच्या मानपानाचे पडसाद गुरूवारच्या बैठकीत उमटतील, असे बोलले जात आहे.



0 Comments