खळबळजनक..महुद-ढाळेवाडी पाटी येथे कार धडकेत स्टॉपवर थांबलेली महिला ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एसटीची वाट पाहत स्टॉपवर थांबलेल्या महिलेला जोराची धडक दिली.
या अपघातात ती महिला गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर मारहाणीच्या भीतीने चालकाने तेथून कारसह धूम ठोकली.
संगीता बापू ढाळे (वय ५४, रा. ढाळेवाडी, महूद, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव असून, हा अपघात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सांगोला-महूद रोडवर घडला. याबाबत मुलगा महादेव बापू ढाळे (रा. ढाळेवाडी) यांनी फिर्याद
दिली आहे. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपघातातील कार कमलापूर येथील असल्याचे पोलिसांना समजले.
संगीता ढाळे ह्या काही कामानिमित्त महूद येथे जाण्यासाठी एसटीची वाट पाहत सांगोला-महूद रोडवर ढाळेवाडी पाटी स्टॉपवर थांबल्या होत्या.
दरम्यान, सांगोल्याहूल भरधाव वेगाने महूदकडे निघालेल्या कारने संगीता ढाळे यांना धडक दिली. हा अपघात सावत्र मुलगा महादेव ढाळे यांच्यासमोर घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यांनी आणि सतीश दीडवाघ, रमेश काळे यांनी गंभीर हे जखमी संगीता ढाळे यांना उपचारासाठी तातडीने सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.


0 Comments