google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात हिवाळी परदेशी पाहुण्या पक्षांच्या आगमनास सुरूवात, तलाव परिसरात निळ्या शेपटीचा माशीमार पक्ष्यांचे दर्शन

Breaking News

सांगोला तालुक्यात हिवाळी परदेशी पाहुण्या पक्षांच्या आगमनास सुरूवात, तलाव परिसरात निळ्या शेपटीचा माशीमार पक्ष्यांचे दर्शन

सांगोला तालुक्यात हिवाळी परदेशी पाहुण्या पक्षांच्या आगमनास सुरूवात, तलाव परिसरात निळ्या शेपटीचा माशीमार पक्ष्यांचे दर्शन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला - सांगली जिल्ह्याच्या व सांगोला तालुक्याच्या सीमा भागातील बुद्धेहाळ तलाव येथे जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे पाण्याची पातळी चांगली आहे. 

तलाव व परिसर येथील निसर्ग, उंच झाडे, तलावाची तटबंदी, ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला बंगला (गेस्ट हाउस) यामुळे पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर आहे.

सध्या या तलावावर ब्ल्यू टेल्ड बी इटर म्हणजेच निळ्या शेपटीचे माशीमार या हिवाळी परदेशी पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. 

सांगोला येथील पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे हे बुद्धेहाळ तलाव येथे पक्षी निरीक्षणास गेले असता त्यांना या शेकडो पक्ष्यांच्या थव्याचे दर्शन झाले.

मराठीमध्ये या पक्ष्याला निळ्या शेपटीचा मधमाशी मार, निळ्या शेपटीचा वेडा राघू किंवा निळ्या शेपटीचा पाणपोपट या विविध नावांनी ओळखले जाते. हा पक्षी सर्वत्र दिसणाऱ्या हिरवा वेडा राघू किंवा बुलबुल या पक्ष्यांपेक्षा आकाराने मोठा

 असून त्यांची लांबी २३ ते २६ सेंटीमीटर इतकी असते. जंगले, पाणवठे हे अधिवास असणाऱ्या या पाणपक्ष्यांच्या पंखांचा रंग मुख्यतः हिरवा असून डोके व पाठ लालसर तपकिरी असतात. 

शेपटीचा रंग आकर्षक निळा असून डोळ्याजवळ निळ्या रंगाचा पट्टा आढळतो. भुवया व चोच काळया रंगाची असते. नर पक्षी मादी पेक्षा आकर्षक रंगांचा असतो.

हे पक्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतामध्ये दक्षिण व दक्षिणोत्तर पूर्व आशिया खंडातून स्थलांतर करून दाखल होतात. हे पक्षी भारत, बांगलादेश, मलेशिया, म्यानमार आणि पाकिस्तान या देशांत आढळतात. 

महाराष्ट्र तसेच कर्नाटक या राज्यांमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात यांचा विणीचा काळ असतो. हे पक्षी मोठे जलाशय, नद्या, पानवठे या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने थव्यांमध्ये आढळतात.

 तसेच तलाव, सरोवरे व दलदलीचे भूभाग अशा ठिकाणी त्यांचे अधिवास आढळतात. यांचे मुख्य अन्न हे मधमाशा असून ते हवेत उडत असताना मधमाशा पकडण्यामध्ये पारंगत असतात. 

पकडलेली मधमाशी हवेत फेकून झेल घेऊन खातात. मधमाशी हवेत उडवून पुन्हा पकडून खाण्याच्या या क्षणांची फोटोग्राफी करण्यासाठी वन्यजीव फोटोग्राफर्स उत्सुक असतात.

सांगोल्यातील पक्षी निरीक्षणाच्या इतिहासातील या पक्षाची ही प्रथमच नोंद झाली आहे. सांगोला तालुक्यामध्ये हिवाळी परदेशी पाहुणे म्हणून स्थलांतर करून दाखल होतात. 

निळा शेपटीचा वेडा राघू या पक्ष्याला मधमाशांची शिकार करून खाताना पाहणे हे अत्यंत विलोभनीय दृश्य असते.

-प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, पक्षी अभ्यासक, सांगोला

Post a Comment

0 Comments