ब्रेकिंग न्यूज..गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करून शेतकरी, पशुपालक, व्यापारी यांना लुबाडणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात कठोर लढा देऊया :
आमदार सदाभाऊ खोत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोर्चात सहभागी
सांगोला/ प्रतिनिधी:(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
शेतकरी, पशुपालक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते कृती समिती सांगोला यांच्यावतीने गोवंश हत्या बंदी कायदा व गोरक्षका विरोधात सांगोला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत
यांनी तहसील कार्यालयावरील मोर्चामध्ये सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षका विरोधात सर्वांनी आता तीव्रपणे लढा देण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले.
आमच्या जनावरांच्या गोठ्यावर दिवसाच दरोडा टाकणाऱ्या गोरक्षकांना झोडपुन काढा. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करीत आहे. दूध व्यवसायावर कुटुंबाचा संसार चालवत आहे.
पशुपालक शेतकरी कुटुंबातील मोठा आर्थिक खर्च जनावरांच्या माध्यमातून भागवतो. शासनाने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आहे. शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मला राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे.
राज्यात 295 गोशाळा असून त्या ठिकाणी 2 लाख गायी अस्तित्वात आहेत. शेतकऱ्याकडे दीड कोटी जनावरे आहेत. गोवंश बंदी हत्या कायदा राबवायचाच असेल तर शेतकऱ्याला प्रति जनावरामागे अनुदान द्या. अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा.
गोरक्षकांना आमच्या जनावरांच्या गोठ्यात कामाला ठेवू मग त्याने जनावरे कशी सांभाळयची हे ठरवावे. संकरित बैल,खोंड बाजारात विकणे गरजेचे असताना गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षक, शेतकरी, पशुपालक,
व्यापारी यांची फार मोठ्या प्रमाणात लुट करतात हे आम्ही यापुढे सहन करणार नाही. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सांगोलाच्या मोर्चात सहभागी झालो असे विचार माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोला येथे व्यक्त केले.
शेतकरी, पशुपालक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते कृती समिती सांगोला यांच्यावतीने गोवंश हत्या बंदी कायदा व गोरक्षका विरोधात सांगोला तहसील कार्यालयावर गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत हे बोलत होते. यावेळी मोर्चेकर्याकडून महसूल नायब तहसीलदार नितीन जाधव यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, बाजारात भाकड जनावरे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना लुटायचे काम हे गोरक्षक करीत आहेत.
त्यामुळे आज बाजारात भाकड जनावरांना कोणी विचारतही नाही. मग शेतकऱ्यांची भाकड जनावराची अडचण कोण सोडवणार ? जनावरे विकायची नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येक जनावरामागे अनुदान द्यावे.
अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा . गोरक्षकाकडून होणारी लूट व दिवसा ढवळ्या टाकण्यात येणारा दरोडा बंद करावा . जनावर विकायला बाजारात परवानगी द्यावी अन्यथा जनावरांचे बाजार बंद करावेत.
हळूहळू जनावरांची संख्या कमी होत चालली आहे. जनावराला दर नाहीत. दुधाला दर नाहीत ही परिस्थिती शेतकऱ्यांपुढे गंभीर बनत चालली आहे. गोरक्षकाला लायसन कोणी दिले .
वर्षानुवर्षे जनावरांचा सांभाळ करायचा व विक्री करताना गोरक्षकांनी आडवे यायचे हे योग्य नाही. आमच्या जनावरांचा गोठा लुटायला निघालेल्या गोरक्षकांना धडा शिकवला पाहिजे.
शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. शेतकरी आपली जनावरे गरजे पोटी विकतो. गोरक्षकाकडून शेतकरी ,व्यापारी, पशुपालकावर, एक प्रकारे अन्याय होत आहे.
गोरक्षकाच्या मदतीला पोलिस धावून जातात हे योग्य नाही. शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी हे सहन करणार नाही . याविरोधात लढा तीव्र करणार आहे. गोरक्षकांनी सत्ता गोपालन करावे तसेच त्यांनी कत्तलखाने बंद करावेत मग आमच्याकडे यावे.
गोरक्षक व पोलिसांचा बंदोबस्त केला तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल. शेतकऱ्यानी जगायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीची स्थितीही बिकट आहे. स्व. आम. गणपतराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम लढा दिला होता.
या भागात येऊन मी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देत आहे. गावागावात गोरक्षका विरोधात लढा तीव्र करूया. गोवंश बंदी कायदा व त्याचे परिणाम याची सरकारला जाणीव करून देण्याचे वचन आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोला येथील मोर्चामध्ये दिले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार म्हणाले, गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली गोरक्षकाकडून होणारी लूट यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे .शेतकरी वर्गावर एक प्रकारे अन्याय होत आहे.
खिलार जाणावरे सांभाळण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे. सरकार शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय करत आहे. गोरक्षकांनी आमची जनावरे फुकट सांभाळण्यास घेऊन जावीत.
यावेळी बापूसाहेब ठोकळे म्हणाले, आम्ही केलेल्या कष्टाचे फळ आम्हाला खाऊ द्या. यापुढे व्यापारी व पशुपालक शेतकरी गोरक्षकांना धडा शिकवतील .
गोवंश हत्या बंदी कायदा रद्द केला पाहिजे ह्या प्रमुख मागण्या केल्या. व्यापारी ,खाटीक, कुरेशी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, बाळासाहेब बनसोडे, सुबोध वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम, पत्रकार रवींद्र कांबळे, पत्रकार संतोष साठे, शिवसेनेचे युवा नेते तुषार इंगळे,
ॲड. महादेव कांबळे, सुहास पाटील यांनी आपल्या मनोगत सांगितले की, आमदार सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे नेते असून तेच शेतकऱ्यांना न्याय देतील .गोवंश बंदी कायदा रद्द करावा अन्यथा त्यामध्ये बदल करावा.
गोरक्षकांनी शेतकरी, पशुपालक व व्यापाऱ्यावरचा अन्याय थांबवावा. दिवसेंदिवस गाईंची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याने खिलार जनावरे संपुष्टात येतील.
गाईंचे अस्तित्व वाचवायचे असेल तर गोवंश बंदी कायदा रद्द झाला पाहिजे. कुरेशीबांधवावर अन्याय होऊ नये. गेल्या दोन महिन्यापासून गोरक्षकाच्या अमानुष वगणुकीमुळे बाजारात भाकड जनावरे विकली नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यापुढे कुटुंबातील मोठ्या खर्चाचे नियोजन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारा नेता म्हणून सदाभाऊ खोत या गंभीर प्रश्नामध्ये लक्ष घालतील.
गोवंश हत्या बंदी कायदा व गोरक्षकावर कठोर कारवाई करा या मागणीसाठी सांगोला तहसीलवर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पशुपालक, व्यापारी, कुरेशी, खाटीक बांधव,
सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सुबोध वाघमोडे निमंत्रक सोलापूर ,राजाभाऊ कदम पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस भीमशक्ती ,प्रवीण सोनवणे जिल्हाध्यक्ष बहुजन विकास आघाडी सोलापूर हे सहभागी झाले होते.
चौकट: सांगोला येथे गोवंश हत्या बंदी कायदा व गोरक्षका विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गोवा हत्या बंदी कायद्याची चुकीच्या दिशेने अंमलबजावणी होत आहे.
खिलार जनावर वाचलं पाहिजे व त्यामध्ये वाढ झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. सरकारने गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये योग्य ते बदल करावेत.: चेतनसिंह केदार- सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष
0 Comments