धक्कादायक ..वारंवार कर्जे काढणाऱ्या पत्नीचा गळा चिरला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ
वारंवार कर्जे घेणाऱ्या पत्नीचा पतीने गळा चिरून खून केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. अस्मिता परशराम पाटील (वय ४२, रा. महालक्ष्मीनगर, आपटेनगर परिसर) असे तिचे नाव आहे.
गेल्या पाच वर्षांत कर्जापोटी स्वतःचे घरही विकण्याची वेळ आल्याने तिचा खून केल्याची कबुली संशयित परशराम पांडुरंग पाटील (वय ४४) याने करवीर पोलिसांकडे दिली आहे.
खून केल्यानंतर त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटील कुटुंब मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण गावचे रहिवासी आहेत.
परशराम औद्योगिक वसाहतीत फाउंड्रीमध्ये काम करतात. ते, वडील, पत्नी व दोन मुलांसोबत अनेक वर्षांपासून आपटेनगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे याच परिसरात स्वतःचे घर होते;
परंतु, काही वर्षांपूर्वी अस्मिता पाटील यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना राहते घर २० लाख रुपयांना विकावे लागले होते. सध्या ते एका भाडेतत्त्वावरील घरात राहण्यास होते.
कर्जावरून वारंवार भांडणे...
अस्मिता यांची मुले सध्या नोकरीला जातात; परंतु, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पुन्हा मुलांच्या नावाने प्रत्येकी एक लाख रुपयांची कर्जे घेतली होती. ही माहिती पती परशराम यांना मिळाली.
या पैशांचे नेमके काय केले, हे त्या सांगत नसल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. गेले काही दिवस दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
मंगळवारी रात्री दोन्ही मुले त्यांच्या मित्राला आणण्यासाठी बाहेर गेली होती. वडील आतील खोलीत झोपले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला.
यानंतर परशराम याने खोलीला आतून कडी लावली. पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर चाकूने गळा चिरला. त्या मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर स्वतः ११२ क्रमांकावर फोन करून याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिस तातडीने दाखल....
करवीर पोलिस ठाण्याची रात्रगस्तीचे वाहन काही अंतरावर होते. त्यांना याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. खोलीला आतून कडी असल्याने त्यांनी दरवाजा ढकलून आत प्रवेश केला.
यानंतर त्यांनी खाली पडलेल्या अस्मिता यांना सीपीआरकडे हलविले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कर्जाने कुटुंबाची वाताहत...
परशराम फाउंड्रीमध्ये काम करतो. अस्मिता शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. मोठा मुलगा २२ वर्षांचा, तर छोटा मुलगा २० वर्षांचा आहे.
दोघांनीही शिक्षण पूर्ण होताच नोकरीला सुरुवात केली होती. कर्जातून सुटका होण्यासाठी कष्टाळू कुटुंबीयांची धडपड सुरू होती;
परंतु, अस्मिता यांच्याकडून वारंवार कर्जे काढण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने पतीने त्यांचा जीव घेतला. आईचा मृत्यू, तर वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मुलांना मोठा धक्का बसला आहे.


0 Comments