धक्कादायक प्रकार! मंगळवेढ्यात विषारी वनस्पती पाला खाऊन १०० मेंढ्या, शेळ्या मृत्युमुखी; २५ लाखांचे अचानकपणे नुकसान;
मंगळवेढा :- जत तालुक्यातील बबलाद जवळील सिद्धापूर, आरीकिरी येथील चारशे ते पाचशे मेंढ्या शेळ्या चारण्यासाठी
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागामध्ये आले असता, या भागातील निंबोणी येथील वन विभागातील घाणेरी या विषारी वनस्पतीचा पाला
खाल्ल्याने तब्बल १०० मेंढ्या शेळ्या, लहान पिल्ले जागीच मृत्युमुखी पडले आहेत.सध्या या मेंढ्या जुनोनी (ता. मंगळवेढा) येथील भोसे प्रादेशिक योजनेच्या जवळ आहेत. अजून ६० मेंढ्या बाधित आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मेंढ्या परप्रांतात घेऊन आलेल्या त्या चार मेंढपाळ कुटुंबाचे सुमारे २५ लाखांचे अचानकपणे नुकसान झाल्यामुळे त्या मेंढपाळांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विषबाधित मेंढ्यांवर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू असून, त्यांनी केलेल्या उपचारामुळे उवरित मेंढ्या सुस्थितीत आहेत.
जत तालुक्यातील सिद्धापूर आरकेरी गावातील बारकेश सोनापा सुळ व सुनील जरक हे दोघे मेव्हणे गेल्या २०-२५ दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यात मेंढ्या चारण्यासाठी आले होते.
दरम्यान गेल्या आठ दिवसापूर्वी निंबोणी वन विभागात मेंढ्या चारल्यानंतर नंदेश्वरकडे निघाले असता
त्यातील काही मेंढ्यांनी विषारी घाणेरी औषधी वनस्पती खाल्ल्याने अंगावरील केस निघणे, त्वचा नासणे, जागेत व तोंडावर जखमा होणे अशी लक्षणे जाणवू लागली व त्या मृत पावू लागल्या.
याची खबर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने उपचार केले. परंतु साठ मेंढ्यांची पिल्ले, वीस मोठे मेंढ्या, वीस शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
तर ६० मेंढ्यांवर उपचार चालू आहेत. या दोन मेंढपाळांच्या सुमारे ३०० ते ३५० असून त्यातील सुमारे दीडशे मेंढ्यांना घाणेरी वनस्पती खाल्ल्याने विषबाधा झाली आहे.
याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घाणेरी वनस्पती खाल्ली असून, या शेळ्या मेंढ्यांना कावीळसदृश रोगाची लागण झाल्याने वा मरण पावल्या आहेत.
जुनोनी येथील सरपंच दत्तात्रय माने यांनी या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
तसेच उर्वरित शेळ्या मेंढ्यांना चारण्यासाठी गावातील शेतकऱ्यांना माहिती देऊन माणुसकीच्या नात्याने गावात चारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
या घटनेची माहिती नंदेश्वर येथील आकाश डांगे यांनी आमदार समाधान आवताडे यांना देताच आ. आवताडे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून
स्वीय सहायक रावसाहेब फटे यांच्यामार्फत संबंधित लोकांना संपर्क साधून घटनास्थळी भेट दिली. या भेटीप्रसंगी झालेले पशुधन नुकसान आणि मेंढपाळांची अवस्था पाहून आ.आवताडे यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
यावेळी आ.आवताडे यांनी वन विभाग अधिकारी शीतल साठे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भाले यांच्याशी संपर्क करुन उर्वरित बाधा
झालेल्या जनावरांना आवश्यक योग्य उपचार करुन मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे करुन सर्वतोपरी मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
बांधलेल्या अनुमानानुसार आणि केलेल्या चर्चेअंती झालेले एकूण नुकसान जवळपास २५ लाखांच्या घरात आहे.
त्यामुळे कधीही भरून न येणारी आर्थिक हानी झाल्याने या लोकांची प्राचिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. या घटनेने या भागासह मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेने हळहळ व्यक्त केली आहे.
आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे शेळी मेंढ्या असून, ही घडलेली घटना आमच्यासाठी वेदनादायी व दुःखद आहे.
या मृत झालेल्या शेळ्या मेंढ्यांमुळे आमचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले असून शासनाने याबाबत विचार करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. - बारकेस सूळ, मेंढपाळ.
0 Comments