खळबळजनक ..सांगोल्यातील चोरांचा बनाव उघड! डोळ्यांत 'स्प्रे' मारून पावणेतेरा लाख रुपये लुटल्याचा बनाव
करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी १६ तासांत केला पर्दाफाश; मंगळवेढा-उमदी रोडवर घडली होती घटना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मंगळवेढा:- उमदीजवळ डोळ्यांत 'स्प्रे' मारून पावणेतेरा लाख रुपये लुटल्याचा बनाव करणाऱ्या टोळीचा उमदी पोलिसांनी १६ तासांत पर्दाफाश केला. प्रमोद सुभाष शिंदे (वय ३२, रा.चौगुले वस्ती, खडकी, ता. मंगळवेढा),
सिद्धेश्वर अशोक डांगे (२७, रा. खडतरे गल्ली, सांगोला), तौफिक समशेर मणेरी (३५, रा. मणेरी मळा, सांगोला) या तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून १२ लाख ७६ हजार रोकड जप्त केली. आणखी एक संशयित अक्षय इंगोले (रा. सांगोला) हा पसार आहे.
मंगळवेढा परिसरातील व्यापारी फारूख शेख यांनी जांभूळ खरेदीसाठी प्रमोद शिंदे याला पावणेतेरा लाखांची रोकड देऊन दि. २ रोजी आंध्र प्रदेशला पाठविले होते.
शिंदे याला एवढी मोठी रोकड पाहून हाव सुटली. त्याने मित्र सिद्धेश्वर डांगे ऊर्फ दादा दांडगे, तौफिक मणेरी, अक्षय इंगोले यांना एकत्र करून चोरीचा बनाव करण्याचे ठरविले. त्यानंतर ही रक्कम आपापसांत वाटून घेण्याचे कारस्थान रचले.
कारस्थानानुसार मंगळवेढा ते ताडपत्री (आंध्र प्रदेश) या मार्गावर उमदीपासून पुढे आरटीओ चेकपोस्टजवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास प्रमोद शिंदे याला उलटी आल्याचे भासविले.
गाडी थांबविल्यानंतर मोटारीतून आलेल्या तिघांपैकी एकाने फिर्यादी अभिजित वाडकर याच्या डोळ्यांवर स्प्रे मारला. तर इतर दोघांनी प्रमोद शिंदे याला मारहाण केली.
त्यानंतर गाडीत असलेल्या सॅकमधील १२ लाख ७६ हजार ८०० रुपये रोकड लंपास केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या वाडकर याने उमदी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
0 Comments