ब्रेकिंग न्यूज! स्वाक्षरीसाठी साहेबांना द्यावे लागतात म्हणून घेतली लाच; मोजणीनंतर विहीर,
बोअरवेल नोंद करण्यासाठी मोजणी ऑफिसमधील लिपिकाने रिक्षा चालकामार्फत घेतले ९००० रूपये सांगोला तालुक्यातील घटना..
सोलापूर : मोजणीनंतर स्वत:च्या हिश्यात विहीर, बोअरवेल नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून रिक्षा चालकामार्फत लाच घेणारा भूमिअभिलेखचा लिपिक शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळळी, ता. सांगोला)
आणि रिक्षा चालक सूरज रवींद्र सर्वगोड (रा.हौसेवस्ती, मरिआई चौक, देगाव रोड, सोलापूर) यांना अटक करण्यात आली. त्या दोघांविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार यांची वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे सात हेक्टर ५२ गुंठे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. तक्रारदार व त्यांच्या भावांच्या क्षेत्राची रीतसर मोजणी झाल्यानंतर पोटहिस्सा पाडून
नकाशे मिळाले होते. त्यानंतर तक्रारदाराच्या पोटहिश्यातील विहीर व बोरवेलची नोंद लावण्यासाठी आकारफोड बाबत दक्षिण सोलापूरच्या उपअधीक्षक
भूमी अभिलेख कार्यालयास अर्ज केला होता. ते काम करून साहेबांची स्वाक्षरी घेऊन तहसिल कार्यालयास पाठविण्यासाठी संशयित आरोपीने दहा हजार रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २८) पडताळणी दरम्यान शंकर बजबळकर याने तडजोडअंती नऊ हजाराची लाच घेण्या
चे मान्य करून रक्कम रिक्षा चालक सर्वगोड यास द्यायला सांगितले. तो खासगी इसम होटगी रोडवरील किनारा हॉटेल परिसरात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला. संशयित आरोपीच्या घर झडतीसाठी पथक तत्काळ रवाना करण्यात आले
असून त्यावेळी घरात काही सापडले नाही. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले व पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार एस. व्ही. कोळी, अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, राजू पवार, सचिन राठोड व चालक राहुल गायकवाड, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने पार पाडली.
0 Comments