सोलापूर जिल्ह्यात बासष्ट हजार जणांना मिळाली मिळकत पत्रिका
राज्यात शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही मिळकत पत्रिका दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७५५ गावांपैकी २९० गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे. तेथील ६२ हजार ७९२ जणांना मिळकत पत्रिका मिळाली आहे.
मिळकतीचे नकाशे काढण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.
केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागाकडून जिल्ह्यात ड्रोनद्वारे भूमापन केले जात आहे. त्याद्वारे मिळकत पत्रिका तयार करण्यात येत आहे. स्वामित्व योजनेत जिल्ह्यातील ७५५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
यातील २९० गावांमध्ये ड्रोनद्वारे भूमापन पूर्ण झाले असून ६५७ गावांचे प्रारूप नकाशे तयार केले आहेत. तर ९० हजार १८७ मिळकत पत्रिका तयार केल्या आहेत. त्यापैकी ६२ हजार ७९२ मिळकत पत्रिकांचे वाटप केले आहे.
यासाठी स्वामित्व योजना महत्त्वाची
गावठाणाच्या जागेवर घर असणाऱ्यांना मालकी हक्कापासून वंचित रहावे लागत होते. मात्र, जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने तयार केले
जात असल्याने गावठाणातील घरांनाही मालकी हक्क प्राप्त झाला आहे. कारण डिजिटलायजेशनमुळे त्यात अचूकता येणार आहे.
या माध्यमातून कायदेशीर पुरावा हक्कही तयार होतो. मालमत्तेच्या संदर्भातील हक्क व दावे आता वाद न होता
सहज निकाली निघण्यास मदत होणार आहे. त्या सोबतच ग्रामपंचायतींना अचूक माहिती मिळाल्याने कर वसुली वाढण्यास मदत होऊन महसुलात भर पडणार आहे.
अशी होते मोजणी, पडताळणी
मोजणी करताना ड्रोनद्वारे संबंधित मिळकतीचे छायाचित्र घेतले जाते. मग भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन हद्दी तपासणी व निश्चिती करतात.
शेजारील हद्दींचीही तपासणी व पडताळणी करून नोंदवहीत त्यात नोंद करतात. भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मिळकतीच्या हद्दीची पुन्हा पडताळणी करून नकाशे अंतिम केले जातात. त्यानंतर नागरिकांना मिळकत पत्रिका दिली जाते.
तालुकानिहाय गावे अन् मिळकतपत्रिका
तालुका गावे मिळकत पत्रिका
अक्कलकोट ०२ ००
उत्तर सोलापूर २१ ८,२३६
दक्षिण सोलापूर ५२ १,१८४
बार्शी ४३ १५,६३०
मोहोळ ११ २,४८१
मंगळवेढा ४७ १२,८९०
पंढरपूर ४० ३४०
सांगोला ३५ १२,१७८
माळशिरस ०१ ८९
माढा १५ ५,१२३
करमाळा २३ ४,६३४
एकूण २९० ६२,७९२
-दादासाहेब घोडके, अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूरस्वामित्व योजनेत जिल्ह्यातील ७५५ गावे समाविष्ट आहे. त्यापैकी ६५७ गावांची तपासणी पूर्ण झाली
असून २९० गावांमधील नकाशे तयार केले आहेत. त्या गावांतील ६२ हजार नागरिकांना मिळकत पत्रिका दिल्या आहेत. उर्वरित गावांतील कामकाज सुरू आहे.
त्या गावांतील नागरिकांनाही टप्प्याटप्प्याने मिळकत पत्रिका दिल्या जातील. याचा नागरिकांना फायदा होणार असून मिळकतीवरुन होणारे तंटे थांबण्यास मदत होणार आहे.
0 Comments